पुणे : मेट्रोच्या पुण्यातील कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून लवकरात लवकर मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. वनाज ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोच्या कामाचे आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमीपूजन होवून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधाताई कुलकर्णी, आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गटनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार,यांच्यासह नगरसेवक, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पुणे मेट्रोला परवानगी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. मात्र भूसंपादन, मेट्रो स्टेशनची जागा, मेट्रोचे मार्ग ठरवणे,कामाचा आराखडा तयार करणे यासारख्या तांत्रिक बाबींमुळे मेट्रोच्या कामाला सुरुवात होण्यास कालीवधी लागला. मात्र सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून आज मेट्रोच्या कामाला पुणे शहरात प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत आहे. आता वेगाने काम होऊन २०२१ पर्यंत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल.
या कामासाठी रस्त्यावरील ९ मीटर जागा लागणार असून रस्त्याच्या दुतर्फा हे काम सुरु राहणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी येथे स्वतंत्र वाहतूक पोलीस तसेच मेट्रोचे वॉर्डन नेमण्यात येणार आहे. या ठिकाणी फक्त पिलर वरती येवू पर्यंत वाहन पार्किंग करता येणार नाही. तो पर्यंत थोडासा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. शिवाजीनगर येथील धान्याच्या गोदामाची जागा मेट्रोच्या ताब्यात मिळाली असून तेथील अन्न धान्य दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामाबद्दल नागरिकांच्या सूचना मिळाव्यात त्यांच्या काही शंका असतील तर त्यांचे निरसन व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत, असेही बापट यांनी सांगितले.

