पिंपरी: सत्तेत राहून ही गेल्या अनेक वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडचा विकास करता आला नाही, म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. लोकांच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध असून येत्या पाच वर्षात या शहराचा नियोजनबद्ध विकास करू असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. येथील शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, आझम पानसरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, हा विजय आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. पिंपरी- चिंचवडचा सर्वांगीण विकास हाच आमचा जाहीरनामा आहे. या शहराचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शहराचे सर्व भाजप नेते व कार्यकर्ते एक टीम म्हणून काम करतील. या शहराची विकासाची खरी व्यवस्था आम्ही लावणार आहोत. भाजपा पिंपरी-चिंचवडच्या विकासात एक दिवसही वाया घालवणार नाही. या औद्योगिक नगरीत असलेले पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत, कचर्यापासून आरोग्यापर्यंतचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू . शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी पीएमटीच्या आणखी बसेस खरेदी करू असे यावेळी त्यांनी सांगितले. पुणे मेट्रोसाठी केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पुढच्या निवडणुकीपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होईल तसेच लोणावळा ते दौंड या मार्गाला केंद्र सरकारची तत्वता मान्यता मिळाली असून, यामुळे शहरात येणारी अनावश्यक वाहतूक टाळून वाहतुकीचा ताण कमी होईल. याबरोबरच शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलांचे तसेच रिंग रोडचे कामही लवकरच सुरू होईल. जाहीरनाम्यातील वचन पूर्ततेसाठी दर तीन महिन्यांनी त्या विषयातील तज्ञासोबत नियोजनबद्ध कार्यक्रमची आखणी करून विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच यावेळी झालेल्या कामांचा आढावा जनतेसमोर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या मुद्दा घेवून निवडणुकीला सामोरे गेल्याने पुण्यासह पिंपरी-चिंचवड मध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्याबद्दल जनतेला धन्यवाद देत यापुढेही सर्वांना सोबत घेवून शहराचा विकास करणार असल्याचे श्री बापट म्हणाले.