पुणे :- गोयल गंगा फौंडेशन कडून बावधन मधील ‘गंगा लेजंड’ येथे पतांगोत्सवाचे आयोजन करण्यात आले.असंख्य पतंग प्रेमींनी पतंगबाजीचा आनंद लुटला. शहरीकरण व वेगवान जीवनमानामुळे बरेच पारंपरिक सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. सकाळी १0 वाजता महोत्सवाला सुरुवात झाली खरी पण, पतंग उडविण्याचा आनंद घेण्यासाठी आतूर झालेले पतंगप्रेमी वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी हजर होते. यात गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यासह लहान मुले, महिला, वयोवृद्धांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटला.
कुटुंबासमवेत बहुरंगी पतंग उडविण्यात सर्वजण दंग झालेले पहायला मिळाले. तसेच यावेळी ‘गंगा लेजंड’ येथे दीड वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या पूर्व प्राथमिक शाळा ‘गंगा अथ’ ची सुरुवात करण्यात आली.
गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले कि,आज एकीकडे समाजात जात,पात,वर्ण अशा मतभेदातुन नकारात्मक संदेश जात आहे. असे असताना आपल्याला लाभलेली सणांची संस्कृती ही यावर मात करण्याची मोठी ताकद आहे. आज या सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण माणुसकीच्या भावनेने एकत्र येतो. यातूनच मानवतेचा सकारात्मक संदेश जातो. आनंदासाठी, एकोप्यासाठी असे सण-उत्सव एकत्र साजरा करण्यावर आमचा भर असतो असेही त्यांनी सांगितले.

