पुणे-पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश बागवे यांनी दिला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पुणे शहरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
मंडईतील यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देऊन जनतेची वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.
या मोर्चात काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अॅड.अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे,संगीता तिवारी ,अजित दरेकर,लता राजगुरू,मनीष आनंद ,सदानंद शेट्टी,सुरेश बोराटे,वाल्मिक जगताप,विठ्ठल थोरात,राजू मगर,सोनाली मारणे,वीरेंद्र किराड ,नरुद्दीन सोमजी,शानी नौशाद ,राधिका मखामले,नीता रजपूत,बाळासाहेब अमराळे,चैतन्य पुरंदरे,अनुसया गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले, “मोदी सरकारच्या काळात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. राज्यात इंधनावर वॅटसह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत.पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरू आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणे हे जनतेच्या हिताचे नाही. सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.