महिलांमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद-हर्षवर्धन पाटील (व्हिडीओ)
पुणे : कॉंग्रेसच्या काळात महिला बचतगटांना ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्विकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरीता कॉंग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यास गावागावातील दारुची बाटली उलटी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे महिलांनीही दाखवून दिले आहे. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन व योग्य संधी मिळाल्यास समाजपरिवर्तनाची ताकद त्या सिद्ध करु शकतील, असे मत माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात स्व.इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महिला बचत गट मेळावा व सप्ताहाच्या समारोपप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरु, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, चेतन आगरवाल, उमेश काची, स्वाती शिंदे, कन्हैयालाल साहनी आदी उपस्थित होते. उस्मानाबाद येथील बचत गटाच्या चळवळीतून पुढे आलेल्या महिला उद्योजिका कमल कुंभार यांना मुख्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सप्ताहाचे यंदा १३ वे वर्ष होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, सेवा, कर्तव्य, त्याग या तिन्ही शब्दांचे तंतोतंत पालन कोणत्या पक्षाने केले, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवे. कॉंग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळापासून याचे पालन केले असून सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन देश बांधण्याचे काम केले आहे. आजच्या काळात निष्ठा, विश्वासर्हता, आदर्श व्यक्तिमत्वांची कमतरता आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे काम करण्यांना आदर्श मानून प्रत्येक महिलेने वाटचाल करायला हवी.
उल्हास पवार म्हणाले, स्त्री ही अबला नसून सबला आहे. अगदी इंदिरा गांधी यांच्यापासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येक स्त्रीने हे दाखवून दिले आहे. मनामध्ये जिद्द असेल, तर महिला कोणतेही काम करु शकतात. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी यांचे नाव पुसण्याचे काम करीत आहेत, ते त्यांच्या ७ पिढयांनाही जमणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, पुण्यात बचत गटांची मोठी चळवळ सुरु असून त्यातून अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आजच्या युगात बचत गटांना मार्केटिंगची आणखी गरज असून त्यांना ताकद देण्याचे काम कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.विकास आबनावे यांनी प्रास्ताविक केले. संगीता तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. अॅड.रमेश पवळे यांनी आभार मानले.