केंद्रातील व राज्यातील सरकारमुळे देशात आर्थिक संकट – खासदार अशोक चव्हाण
पुणे-काँग्रेस उमेदवार नगरसेवक अविनाश बागवे, नूरजहाँ शेख, रफिक अब्दुल रहीम शेख व काँग्रेस पुरस्कृतत उमेदवार जिल्लेहूमा खान यांच्या प्रचारार्थ खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा ओसवाल बंधू समाज मंगल कार्यालय, शंकर शेठ रोड येथे व्यापारी मेळावा पार पडला.
यावेळी व्यापाऱ्यांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या नोट बंदीच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सर्व निर्णय भाजप सरकार घेत असून या संस्थेची स्वायत्तता पूर्णपणे लयाला घालवल्याचे चव्हाण यांनी सांगितले. नोट बंदीच्या काळात रिझर्व बँक ऑफ इंडिया मॅगी बनविण्याच्या आत निर्णय बदलत होते असा टोला त्यांनी लगावला. नोट बंदी मुळे समाजात एक प्रकारची मरगळ आली असून बाजारातील व्यवहार मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच भवानी पेठ व काशीवाडीतील अनेक कष्टकरी लोकांनी नोकरी गमावल्याची खंत बोलून दाखवली.
तसेच बीजेपी सरकार मध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा अभाव असून फक्त काँग्रेसने सुरु केलेल्या योजनांची नावे बदलणे व काँग्रेस ने पूर्ण केलेल्या विकास कामांचे फित कापण्याचे काम बीजेपी सरकार करत आहे अशी तोफ अशोक चव्हाण यांनी डागली. पुण्याच्या विकासासाठी काँग्रेस सरकारने भरीव निधी दिला होता त्यामुळे परराज्यातील गुंतवणुकदारांसाठी पुणे शहरास पहिली पसंती होती परंतु आता गुंतवणूकदार पुण्याकडे पाठ फिरवत आहे अशा प्रकारे बीजेपीने पुणेकरांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षात असताना पुण्यात मेट्रोला विरोध केला परंतु निवडून आल्यावर पुण्याच्या आधी नागपूरचा मेट्रो चा ठराव मंजूर करून बीजेपी सरकार दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच दिवसेंदिवस बीजेपी हा गुंडांचा पक्ष बनत असून, गुंडाना राजाश्रय देण्याचे काम बीजेपी करत असल्याचे तसेच धर्मांद शक्तींना पालिकेत शिरण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस ताकतीने लढनार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी अविनाश बागवे यांच्या संदर्भात बोलताना एक उच्चशिक्षित तरुण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर परिश्रम घेत आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचे अचूक अंदाज घेऊन वेळेत निवारण करताना संपूर्ण शहराला भेडसावणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्स, अनधिकृत मोबाईल टॉवर, जागोजागी अनधिकृत रस्ते खोदून महापालिकेचे केलेले आर्थिक नुकसानीचा प्रश्न पुराव्यासहित मनपा सभागृहात उपस्थित करून महापालिकेचे ४०० ते ४५० कोटी रुपये वाचविल्या बद्दल अशोक चव्हाण यांनी अविनाश बागवे यांचे कौतुक केले. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रथमच उभारण्यात येणाऱ्या पुण्यातील हज हाऊस साठी १ कोटी रुपयांची निधी मंजूर केल्याबद्दल अविनाश बागवे यांचे अभिनंदन केले.
यावेळी समारोप करताना काशेवाडी प्रभागात गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामामुळे लोहियानगर काशेवाडी मधील मतदार काँग्रेसच्या हातालाच साथ देणार असल्याचा विश्वास मा. गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला.
यावेळी चारही उमेदवारांसोबत खासदार अशोक चव्हाण, डॉ. विश्वजित कदम मा. गृहराज्य मंत्री रमेश बागवे, मा. आं. मोहन जोशी, शरद रणपिसे, अभय छाजेड, रशीद शेख, यासेर बागवे, विठ्ठल थोरात, जुबेर शेख, सौ. इंदिरा अविनाश बागवे उपस्थित होत्या.