पुणे- नोटाबंदी करून किती काळा पैसा बाहेर आला याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही स्पष्टीकरण देत नाही.
नोटाबंदीमुळे देशाला काय मिळाले असा सवाल करून नोटाबंदीमुळे प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे त्याची संसदीय
चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त येरवडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार शरद
रणपिसे, पुणे शहर व जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अ.भा.कॉंग्रेस समिती सदस्य गोपाळ तिवारी उमेदवार संतोष
आरडे, सौ. पूर्वा चंदेवळ, सौ संगीता देवकर, सुनील मलके आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, पुणे मेट्रो मी २०१४ साली आणली. पुणे व नागपूर मेट्रोला एकाच दिवशी मान्यता देण्यात आली होती.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच नागपूरच्या मेट्रोला मान्यता मिळवली. पुण्याची
मेट्रो मात्र पावणेतीन वर्षे उशिरा आणली. मुख्यमंत्री जाणूनबुजून पश्चिम महाराष्ट्राबाबत आकसाचे राजकारण करीत आहे.
त्यांना विदर्भाचा विकास करायचा आहे हे ते सांगत आहेत परंतु हा विकास पश्चिम महाराष्ट्राला मागे ठेवून करू नका असा
टोलाही त्यांनी लगावला. पुण्याची मेट्रो पावणेतीन वर्षे उशिरा का आली याचे उत्तर पालकमंत्री गिरीश बापट आणि
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना द्यावेच लागेल असे ते म्हणाले.
राज्यातले सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. परंतु शिवसेना सत्तेत बाहेर पडेल असे वाटत नाही. त्यांची ही
लुटुपुटुची लाढाई आहे असे सांगून चव्हाण म्हणाले शिवसेनेला सत्तेची उब लागली आहे. अडीच वर्षात २ कोटी नोकऱ्या
देवू असे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते मात्र केवळ दीड लाख जनांना नोकऱ्या मिळाल्या. नोटाबंदीमुळे मोठ्या
प्रमाणात लोकांचा रोजगार गेला आहे. अनेकजन आपल्या गावाला निघून गेले आहेत. नोटाबंदी करून काळा पैसा नष्ट
करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगितले परंतु एक काळा पैसा नष्ट झाला नाही. असे सांगून चव्हाण म्हणाले केवळ
घोषणाबाजी करणाऱ्या सरकारला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जाब विचारण्याची वेळ आली आहे.
पुणे शहर कॉंग्रेसने विस्तृत विकासाचा जाहीरनामा बनविला आहे. या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनांची पुर्तता
करण्यासठी आम्ही कटीबद्ध आहोत्त असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रमेश बागवे म्हणाले, भाजप सरकारने अल्पसंख्यांकांचे आरक्षण बंद केले, मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याची भाषा
आरएसएस करत आहे. निवडणुकांमध्ये भाजप सत्तेवर आल्यावर महागाई कमी करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू अशी
आश्वासने दिली. परंतु या सरकारला सत्तेचा मज आला असून विकास तर बाजूलाच पण जातीयवादाचे राजकारण ते
करीत आहेत.
अन्नसुरक्षा कायदा, वाल्मिकी आंबेडकर योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना अशा गोरगरीबांसाठी योजना कॉंग्रेसने
आणल्या परंतु कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. नोटाबंदीमुळे कामगार, झोपडपट्टीधारक हे सर्व हतबल झाले असे
सांगून बागवे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.