मुंबई, 31 ऑक्टोबर 2021
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (नीटी), मुंबई चा 26 वा दीक्षांत समारंभ 31 ऑक्टोबर, 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या दीक्षांत समारंभाला केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे आयआयटी कानपूरचे अध्यक्ष (इस्रोचे माजी अध्यक्ष) डॉ. के. राधाकृष्णन आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे डॉ. अनिल सहस्रबुद्धे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.या दीक्षांत समारंभात श्री. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तंत्रज्ञान आणि ज्ञान यांच्या समन्वयानेच संपूर्ण विकास शक्य आहे. नवोपक्रमाचे मॉडेल तयार करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ज्ञान यांच्या समन्वयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन प्रधान यांनी केले. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (नीटी), मुंबई ने भारतातील व्यवस्थापन संस्थांमध्ये 12 वे स्थान मिळवले आहे ही आनंदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. ”जग बदलण्यासाठी शिक्षण हे एक सामर्थ्यशाली शस्त्र आहे” या नेल्सन मंडेला यांच्या वाक्याचा उल्लेख करत, आपल्या देशातील अव्वल संस्थांमधून पदवी घेतलेल्या स्नातकांनी उद्योजक, संशोधक, व्यावसायिक आणि चांगले मनुष्य होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नव्या भारताच्या उभारणीत बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शिक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहेत, भविष्यातील सज्जतांसाठी आपल्या युवा वर्गाला तयार ठेवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात महत्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत असे ते म्हणाले.
डॉ के राधाकृष्णन म्हणाले की, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाला कशाप्रकारे फायदा होईल यासंदर्भात आणि तंत्रज्ञानाच्या मानवावरील प्रभावाबद्दल देखील विद्यार्थ्यांनी अधिक विचार केला पाहिजे.
डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले, केवळ संस्थांनाच नव्हे तर व्यक्तींना काय शिकायचे आहे ते निवडण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण स्वायत्तता प्रदान करेल. महामारीच्या काळात 11 युनिकॉर्न जन्माला आले हे भारतीय शिक्षण आणि व्यवसाय प्रणालीची लवचिकता दर्शवते, असे सहस्रबुद्धे पुढे म्हणाले. उद्योगाशी परस्परसंवाद आणि सहकार्य हे आमची प्रगती सुलभ करेल यावर राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेचा ठाम विश्वास आहे असे सांगत संस्थेचे संचालक प्रा.मनोजकुमार तिवारी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेने आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने कारखानदारीसाठी बहु-संस्थात्मक दूरदर्शी नेतृत्वाची सुरुवात केली असे त्यांनी सांगितले.या दीक्षांत समारंभात औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयई) ची 49 वी तुकडी, औद्योगिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयएम) ची 26 वी तुकडी, औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयएसईएम)ची 19 वी तुकडी, बांधकाम व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविका आणि प्रकल्प व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका (पीजीडीपीएम) अभ्यासक्रमाच्या 6 वी तुकडी तसेच पीजीपीईएक्स-व्हीएलएफएम अभ्यासक्रमाची दुसरी /तिसरी तुकडी आणि शिष्यवृत्ती तुकडीतील स्नातकांना या समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.संस्था 1963 साली स्थापन झाल्यापासून, औद्योगिक अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनामध्ये विचारशील नेतृत्व करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न करत आहे आणि त्यासोबतच राष्ट्राच्या उत्पादन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनात सहकार्य करत आहे.सध्या ‘नीटी’ च्या वतीने औद्योगिक अभियांत्रिकी, औद्योगिक व्यवस्थापन, शाश्वत व्यवस्थापन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर स्तरावर केंद्रित शैक्षणिक कार्यक्रम प्रदान केले जातात. यासोबतच शिष्यवृत्ती कार्यक्रमासह एक वर्षाची कार्यकारी पदविका ”पीजीपीईक्स-व्हीएलएफएम” देखील प्रदान केली जाते.