स्थानिकांच्या रोजगारासह पर्यावरणपूरक पर्यटन विकसित केले, तर संतुलित विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’ :चर्चासत्रात तज्ञांचे मत
पुणे:
‘तरुणाईला आकर्षित करणारी जंगल भटकंती, पक्षी निरीक्षण, नेचरवॉक अशा विविध उपक्रमांनी नटलेला ‘कॅम्प कॅश्युरिना’ हा पर्यावरणपूरक निसर्ग पर्यटनाचा उपक्रम राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुरुंजी (ता. भोर) येथे सुरू झाला आहे.
अॅडव्हेंचर टुरिझम, तंबुतील शिबिर, व्हॅली क्रॉसिंग, बांबू हाऊस, सायकल सफारी, जलक्रिडा, स्वीस टेंट, नेमबाजी ,स्थानिक खेळ, स्थानिक तरूणां सोबत आट्या-पाट्या, लगोरी, विटीदांडू, बांबू कारागीरीचे कौशल्य गटाद्वारे पाहण्याची संधी, निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
‘ पश्चिम घाटातील निसर्गाचे संवर्धन करीत पर्यावरणपूरक पर्यटनला स्थानिकांच्या रोजगारासह विकसित केले, तर संतुलित विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’ असा सूर यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात रविवारी व्यक्त झाला.
‘सिनर्जी फार्म्स’ने कुरुंजी (भोर) येथील ‘पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प आणि पश्चिम घाट’ या विषयावर आयोजित अभ्याससहल आणि चर्चासत्रात हा सूर उमटला.
संस्थेच्या ‘कॅश्यूरिना’ या पहिल्या पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्पाच्या प्रारंभानिमित्त आयोजित चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी झाले.
‘श्रमजिवी जनता सहायक मंडळा’चे बाळासाहेब कोळेकर, ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे, ‘प्रबोध’ समुहाचे प्रा. रामभाऊ डिंबळे, प्रा. विवेक कुलकर्णी, हेरीटेज वॉक अभ्यासक प्रा. गणेश राऊत, ‘ट्रेकडी’ संस्थेचे पिनाकीन कर्वे सहभागी झाले होते.
‘सिनर्जी’चे राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मंदार देवगावकर यांनी स्वागत केले.
बाळासाहेब कोळेकर म्हणाले, ‘पश्चिम घाटातील जैवविविधता सांभाळताना आणि निसर्गाची जपणूक करताना स्थानिकांना रोजगार देणे ही महत्त्वाची बाब असते. त्यावर पर्यावरणपूरक पर्यटन हा चांगला उपाय आहे.’
ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे म्हणाले, ‘स्थानिक पर्यटन प्रकल्पात नैसर्गिक संसाधनांचा उपयोग जसे की बांबू, दगड, माती यांचा उपयोग करून बांधकामे केली, तर ती पर्यावरणपूरक ठरतील आणि स्थानिकांना रोजगार देता येतील.
प्रा. रामभाऊ डिंबळे म्हणाले, ‘स्थानिक निसर्ग आणि परंपरा जपताना तेथील हस्तकला, दैनंदिन जीवनपद्धती, भोजनासहीत जीवनशैलीबाबत न्यूनगंड निर्माण होऊ न देता त्या गोष्टींचा उपयोग करून घेतला पाहिजे.’
‘ट्रेकडी’ संस्थेचे पिनाकीन कर्वे म्हणाले, ‘नेचर वॉक, गड किल्ले पर्यटन, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण अशा गोष्टींची जोड पर्यावरणाला दिली तर शहरी मंडळींनाही ग्रामीण भागातील पर्यटनाचा लळा लागेल.’
‘सिनर्जी फार्मस्’ चे राजेंद्र आवटे यांनी या संदर्भातील साधन व्यक्ती, प्रकल्प आणि स्थानिकांसह एकत्रित पुढाकार घेण्याची आणि यशस्वी समन्वय साधण्याची जबाबदारी ‘सिनर्जी’ सारख्या संस्था पार पाडतील, असे सांगितले.
यावेळी सायकलिंग, व्हॅली क्रॉसिंग, बांबू हाऊस, सायकल सफारी, जलक्रिडा, स्वीस टेंट, नेमबाजी ,स्विमिंग पूल अशा सुविधा आणि पर्यावरणपूरक बांधकामांची ओळख करून देण्यात आली.स्थानिक तरुणांनी पोवाडा सादर केला .
भोर तालुक्यातील राजगडाजवळ कुरुंजी गावात भाटघर धरणाच्या पाणी साठ्यालगत ,सुरुच्या (कॅश्युरिना)झाडांनी वेढलेल्या या पर्यटन निवास प्रकल्पात कॅम्प घेण्याची भोजन-निवासासह सुविधा आहे. अॅडव्हेंचर टुरिझम, तंबुतील शिबिर यांची सुविधा आहे. धरण साठ्यातील पाण्यात बोटिंग सुविधा ही उपलब्ध करण्यात येणार आहे. भाटघर जलाशयात नौकानयन आणि जलक्रिडा ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्टे असणार आहे.