पुणे-पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात दबदबा असलेला कुख्यात गुंड अशी उपाधी ज्यास नेहमी लावली जाते त्या कमलाकर ऊर्फ बाबा बोडके याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बोडके याचे मुख्यमंत्र्यासमवेतच्या भेटीचे छायाचित्र प्रसारित झाले आहे.
राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना बोडकेने अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर सभेत प्रवेश केला होता. त्या वेळी प्रसारमाध्यमांनी बोडकेच्या पक्षप्रवेशावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर तातडीने बोडके यास राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आले होते .
गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीपासून फारकत घेऊन राजकीय कारकीर्द घडवण्याचा प्रयत्न बोडके याच्याकडून सुरू असल्याचा दावा केला जातो आहे .बोडकेविरुद्ध खून, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे अकरा गुन्ह्य़ांत न्यायालयाने त्याची मुक्तता केली. एक खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे. सन २००३ मध्ये त्याला तडीपार करण्यात आले होते. आता बोडके भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बोडकेने भोरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित देखील झाले होते. त्या वेळी बोडके थेट मातोश्रीवर गेला असे सांगितले जाते . मात्र ऐन वेळी बोडकेचे तिकिट कापले गेले. तेथून कुलदीप कोंडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. प्रस्थापित आमदार संग्राम थोपटे यांना शह देण्यासाठी बोडके याने गेली काही वर्ष सातत्याने प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगण्यात येते . दरम्यान, बोडकेने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे छायाचित्र शुक्रवारी प्रसारित झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून रात्री उशिरा यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक हावरे या त्यांच्या अॅपच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी संबंधित व्यक्ती तेथे होती. तेव्हाच हे छायाचित्र काढले गेले. बाबा बोडके ही व्यक्ती कोण आहे, याची माहिती देखील मुख्यमंत्र्याना नव्हती,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे.