कृषी विभागाच्या 75 टक्के रिक्त जागा भरण्यात याव्यात- मुख्यमंत्री
मुंबई :कृषी विभागाच्या विविध योजनांचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. कृषीमंत्री श्री एकनाथ खडसे, श्री चंद्रकांतदादा पाटील, श्री राम शिंदे हे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत कृषी विभागातील रिक्त पदे, मूल्यवर्धित प्रकल्प, स्वयंचलित हवामान केंद्र, राष्ट्रीय ई-बाजारपेठ, इस्त्रालयच्या मदतीने राबविले जात असलेले प्रकल्प, उस उत्पादन होत असलेला अधिकाधिक भाग ठिबक सिंचनाखाली आणणे तसेच इतरही अनेक विषयांवर या बैठकीत आढावा घेण्यात आला. कृषी विभागात अनेक योजना राबविल्या जात असल्याने आणि शेतीला शाश्वत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात असल्याने 75 टक्के रिक्त जागा भरण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वयंचलित हवामान केंद्राच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि अंतिम निर्णय येत्या 10 दिवसांत घेण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. रूची सोया, सोयाबीन ऑईल रिफायनरिंग प्रकल्प, कोकाकोला, पेप्सिको यासारख्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. कृषी विभागाने येत्या 5 वर्षांत 6.61 लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येईल, असे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.