मूल्यशिक्षणाचे संस्कार देणारी ‘चिंटू गँग’ दिनदर्शिका 2016-17 प्रकाशित
पुणे :
‘दैनंदिन जीवनातील नागरी वागणुकीचे, सामाजिक जबाबदार्यांचे नागरीक म्हणून संस्कार लहान बालकांवर, विद्यार्थ्यांवर झाले पाहिजेत,’ असे आग्रही प्रतिपादन ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
सामाजिक भान जपणार्या ‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ आणि ‘जनता सहकारी बँक, पुणे’ या संस्थांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘चिंटू गँग 2016-17’ या शैक्षणिक वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने व्यंगचित्रातून सामाजिक संदेश देणारी ‘चिंटू’ ही व्यक्तिरेखा, अनेक मान्यवरांचे लेख, विचार घेऊन प्रकाशित झाली आहे. हे या दिनदर्शिकेचे तिसरे वर्ष आहे.
‘चिंटू गँग’ या दिनदर्शिकेमध्ये ह.वि. सरदेसाई, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, प्रा. अरविंद गुप्त , डॉ. अरुणा ढेरे, विद्या पटवर्धन, उमेश झिरपे, गायक आनंद भाटे व श्रीनिवास जोशी तसेच संगीतकार कौशल इनामदार, अभिनेते सुव्रत जोशी, पार्थ भालेराव आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या मान्यवरांनी मांडलेले विचार समाविष्ट आहे.
मंगेश तेंडूलकर म्हणाले, ‘25 वर्षांपूर्वी चिंटू जितका लाडका, टवटवीत आणि मार्गदर्शक होता. तितकाच आजही मार्गदर्शक मित्र आहे. विचारवंत आणि बृद्धीवंतांचा जरासा तोल गेला, तरी विनोदापेक्षा हातात काही लागत नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘चिंटू’ चा सामाजिक संदेश देणारा वावर अधिक मार्गदर्शक आहे. आजचे राजकारणी जसे वागतात, त्यातून मलाही हलकी फुलकी व्यंगचित्रे काढावीशी वाटतात.’
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाल्या, ‘लहान बालके आणि विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण, नागरी शिक्षण देण्यासाठी ‘चिंटू गँग’ही दिनदर्शिका उपयुक्त आहे. प्रकाशक संस्थांनी पालक असल्याची जबाबदारी घेतल्याने ही दिनदर्शिका चांगली झाली आहे. आपल्या जगण्यातून, वागण्यातून लहान मुलांना शिकविले पाहिजे. सिग्नल पाळणे, हेल्मेट घालणे, पाणी वाचविणे या संदेशापासून जबाबदार नागरिक होण्याचे शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. ‘चिंटू गँग’ ही दिनदर्शिका इंग्रजीत तसेच अन्य भाषांत आली पाहिजे. ही दिनदर्शिका एक सुंदर कल्पना म्हणून समाजाला भेट मिळाली आहे.’
चारूहास पंडित म्हणाले, ‘चांगली निर्मिती या निमित्ताने समाज शिक्षणासाठी पुढे येत आहे, याचा आनंद मोठा आहे. पर्यावरण, निसर्ग, पाणी, वीज, रहदारी, सहृदयता, सार्वजनिक स्वच्छता व सामाजिक मूल्ये याबाबत जागृत असणारा चिंटू व त्याचे सर्व मित्र, आई-बाबा आणि आजी-आजोबा ‘चिंटू गँग’ द्वारे आपल्याला भेटतात. ‘चिंटू अॅनिमेशन्स’च्या शॉर्ट फिल्मस् देखील लवकरच सुरू करीत आहोत.’
‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’चे मकरंद केळकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी या दिनदर्शिकेत लेखन करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

