शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या उद्यमगौरव आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण
पुणे :
‘वाईट गोष्टींवर चर्चा करून जगात सर्व वाईटच चालले आहे असे वातावरण तयार होत असताना चांगल्या कामाचे कौतुक करणारे समाजमन तयार होण्याची गरज आहे . खोटी नाणी समाजात फिरत राहतात आणि चांगली नाणी खिशात पडून राहतात ,अशा वेळी राजकारणातही चांगली माणसे आली नाहीत तर नको त्या व्यक्तीं पोकळी भरून काढतील ‘ असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले
शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टचा उद्यमगौरव आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा रविवारी बाल शिक्षण मंदिर (कोथरूड ) येथे गिरीश बापट आणि डॉ विश्वनाथ कराड यांच्या हस्ते झाला . यावेळी अध्यक्ष स्थानावरून गिरीश बापट बोलत होते .
या कार्यक्रमात गिरीश कसमळकर (सॉफ्टवेअर क्वालिटी सिस्टिम्स ),गिरीश शहा ,मिलिंद शहा (रमेश डाईंग ) यांना उद्यमगौरव पुरस्कार देऊन आणि सुंदरगिरी महाराज (नदी पुनर्जीवन प्रकल्प ,सेवागिरी महाराज ट्रस्ट ),बस्तू रेगे (संतुलन पाषाण शाळा ) यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून सोहळ्याचे हे 19 वे वर्ष आहे .
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले ,’समाजात चांगल्या बोलणाऱ्या पोपटापेक्षा वट वाघळांची संख्या वाढत आहे . सरळ जग पण त्यामुळे त्यांना उलटे दिसते . वाईट गोष्टींवर रोज टीका -चर्चा होताना जगात सर्व वाईटच चालले आहे असे वातावरण तयार होत आहे . सकारात्मकता कमी होत आहे . अशा वेळी चांगल्या कामाचे कौतुक करणारे समाजमन तयार होण्याची गरज आहे . कार्यक्रमाचा खर्च करतो ,असे सांगून पुरस्कार देखील मिळवले जात असताना शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट ने समाजात तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन 19 वर्षात वेगळी उंची गाठली आहे .
सर्व सामान्य लोक राजकारणापासून अलिप्त राहतात याकडे लक्ष वेधून ते म्हणाले ,’ चांगल्या व्यक्ती सर्व क्षेत्रात जात असताना राजकारणात मात्र येत नाहीत . राजकारणात लबाड आणि खोटे बोलणारे लोक येतात . मग राजकारण कसे सुधारणार ? राजकारणातही चांगली माणसे आली नाहीत तर नको त्या व्यक्तीं पोकळी भरून काढतील ‘
डॉ विश्वनाथ कराड म्हणाले ,’भारतीय संस्कृती जगाच्या गुरु स्थानी जाणार आहे .भारतीय विचारांचा परिपाक या पुरस्कार वितरणातून ,गुणी जनांच्या सन्मानातून होत आहे . हे महत्वाचे आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग हा भारतीय विचार जगात प्रसिद्ध केला ही मोठी गोष्ट आहे . भारतीय संस्कृती जगाच्या गुरु स्थानी जाणार आहे ,हेच यातून प्रतीत होत आहे ‘
प्रास्ताविक मोहन गुजराथी यांनी केले . अदिती गुजराथी -सराफ यांनी सूत्र संचालन केले .
यावेळी डॉ अनंत सरदेशमुख ,जयंत गुजराथी ,कन्हेय्यालाल गुजराथी ,विपुल गुजराथी ,विशाखा गुजराथी ,डॉ चैतन्य सराफ ,डॉ सुभाष देवी ,ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ . गिरीश बापट ,पोपटलाल ओस्तवाल ,प्रवीण चोरबोले ,श्याम भुर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

