आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती असून, राज्यभरात ही जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील चैत्यभूमीला पोहोचले असून, त्यांनी महामानवाला अभिवादन केले आहे. त्याच्यांसोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे निर्बंध आणले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने यावर्षी राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

आज आंबेडकर जयंती मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्याची जय्यत तयारी ठिकठिकाणी सुरू आहे. राज्यभरात रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत व मोठ्या मैदानांतही महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यंदा मोठ्या संख्येने नागरिक चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी दिवसभर कामाची पाहणी सुरू होती. नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याची सुविधा, रुग्णवाहिका आदींची सोय पालिकेने केली आहे. चैत्यभूमीच्या परिसरात फुलांनी सजावट करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांसाठी दादर चौपाटीवर नव्याने उभारलेले माता रमाबाई आंबेडकर डेक हे नवे आकर्षण असेल. त्या भागातही पालिकेने सुशोभिकरण केले आहे.

