डॉ विद्याधर वाटवे व सुमित्रा भावे यांना डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान
पुणे: पारंपारिक शिक्षणपद्धतीतून मिळणारे शिक्षण ज्यांना समजले नाही अशा अनेक महान व्यक्तींना खरे तर कला, क्रीडा व चित्रपटासारख्या माध्यमाची भाषा समजत होती व त्याच शिकलेल्या कलेतून किंवा भाषेतून त्यांनी आपले विश्व उभे केले त्यामुळे आपल्याला शिक्षणाची नाही तर शिकण्याची भाषा अवगत करण्याची गरज आहे व त्यातूनच आपण खूप काही साध्य करू शकतो असे मट ज्येष्ठ सिने अभिनेते व मानसोपचारतज्ञ डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केले
मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणेच्या वतीने वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या “जीवनगौरव पुरस्कार वितरण व समुपदेशन अभ्यासक्रम उद्घाटन” सोहळ्याप्रसंगी जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे व ज्येष्ठ मानसिक आरोग्य सिने दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना डॉ मोहन आगाशे व समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सदानंद पाटील यांच्या हस्ते “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कर्वे समाज सेवा संस्थेचे चेअरमन सदानंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, प्र. संचालक डॉ. महेश ठाकूर, मेंटल हेल्थ फोरमचे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण, फोरम चे सल्लागार डॉ सुप्रकाश चौधरी व डॉ वासुदेव परळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये हा सोहळा पार पडला.
डॉ मोहन आगाशे यांनी स्वत: अभिनय केलेल्या “आस्तु” व राष्ट्रीय परस्कार वेजेत्या “कासव” या सिनेमांबरोबरच चित्रपट श्रुष्टीमध्ये डझनभर मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या सुमित्रा भावे तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी संपूर्णपणे वाहून घेतलेल्या डॉ विद्याधर वाटवे यांना मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्थेद्वारे देण्यात येणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हा अतिशय योग्य निर्णय असल्याचे सांगत दोन्ही पुरस्कार्थींचे मनापासून कौतुक केले.
आपणास मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा आपण तमाम मनोरुग्णांना समर्पित करीत असून यापुढेही मनोरुग्णांची मनोभावे सेवा करण्याचे हे अविरत कार्य असेच अखंडितपणे चालू राहणार असल्याचे तसेच नवीन मानसिक आरोग्य कायदा २०१७ कायद्यानुसार मनोरुग्ण व त्यांच्या परिवारासाठी काही जठील असणारे निकष शिथिल करून मानसिक आरोग्य सेवा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे मत डॉ वाटवे यांनी परस्कारास उत्तर देताना व्यक्त केले.
चित्रपटाची एक वेगळी भाषा असते ती आपणास समजली व ती समजलेली भाषा लोकांपर्यंत पोहोचवून चित्रपट किंवा मनोरंजनाच्यासारख्या सोप्या माध्यमाच्या मदतीने समाजजागृती करण्यासाठी आपण नोकरी व पीएचडी चे काम सोडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलो व समाजजागृतीपर मानसिक आरोग्यावर आधारित चित्रपट दिग्दर्शित केले असे मत डॉ सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.
डॉ. सदानंद पाटील म्हणाले, जीवन गौरव पुरस्कार्थीचे मानसिक आरोग्य क्षेत्रातील पर्वतासमान कार्य समाजाला माहित असून समाजकार्याच्या व मानसिक आरोग्य क्षेत्रामधील नवीन तरुणांनी त्यांच्या या कार्याचा आदर्श समोर ठेऊन कार्य केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद देशपांडे यांनी जीवन गौरव पुरस्कार्थींचे मानसिक आरोग्य क्षेत्रातील कार्य हे अतुलनीय असल्याचे सांगत कर्वे समाज सेवा संस्थेकडून त्यांचा गौरव करीत असताना संस्थेलाही त्यांच्या महान कार्याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली.
डॉ दीपक वलोकर, डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, डॉ सुप्रकाश चौधरी, डॉ. वासुदेव परळीकर, तसेच काही निवडक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करीत जीवन गौरव पुरस्कार्थी तसेच समुपदेशन अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वालनाने करण्यात आली. स्मिता गोडसे, शिल्पा तांबे, डॉ. योगेश पोकळे, स्नेहल सस्ताकर, डॉ. अनुराधा पाटील, डॉ. जयदीप पाटील, डॉ. अल्पना वैद्य, नीलिमा बापट, धनश्री वीरकर आदी मेंटल हेल्थ फोरमच्या सल्लागारांचे स्वागत विद्यार्थांनी केले.
रमण दळवी, अलोक साळुंके, भाग्यश्री दिक्षित, सोनाली जेडगे, कुणाल बनुबाकावडे आदींनी जीवन गौरव पुरस्कार्थीच्या जीवनावर दृक्श्राव्य माध्यमातून सादरीकरण करीत प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन दिवाण यांनी केले. सूत्रसंचालन मदन पथवे व शर्मिला सय्यद यांनी केले. तर आभार स्मिता लोंढे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कीर्ती सूर्यवंशी, वैशाली देवळकर, नम्रता भोसले, अनघा बरके, जान्ह्ववी सोमण, सिमिथिनी पवार, पद्मजा शिंदे, अश्विनी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

