व्यापाऱ्यांचे प्रश्न गंभीर; केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करणार
पुणे, दि. 8 ऑगस्ट : कोरोनाचा काळ आता दीड वर्षांहून अधिक झाला आहे. या काळात आपण तीन वेळा मोठ्या लॉकडाऊनला सामोरे गेलो आहोत. जीवनावश्यक वस्तुंचे व्यापारी वगळता इतर सर्व व्यापारी व व्यावसायिकांचे गेल्या दीड वर्षांत मोठी हानी झाली आहे. अनेकांना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल देखील नाही. इतरांची परिस्थितीही गंभीर आहे. अशा काळात आता व्यापाऱ्यांवर इतर कोणतीही बंधने लादू नयेत आणि त्यांना मदत करावी यासंदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारशी लवकरच चर्चा करणार असल्याचे कॅट व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय यांनी आज पुण्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान सांगितले, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेच्या पदग्रहण सोहळ्यासाठी आलेल्या बी सी भारतीय यांनी पुणे शहरातील इतर सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी कॅट महाराष्ट्रचे अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, कॅट महाराष्ट्रच्या महिला अध्यक्ष ज्योती अवस्थी, पुणे व्यापारी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, सरचिटणीस नवनाथ सोमसे, उपाध्यक्ष विकास मुंदडा, उपाध्यक्ष अजित चंगेडिया, सचिव उमेशचंद्र यादव, पुणे शहराध्यक्ष विजय नरेला, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रमेश चौधरी, महिला विभाग अध्यक्ष शिल्पा भोसले व उपाध्यक्ष संगीता पाटणे, हवेली तालुकाध्यक्ष उमेश चौधरी, शिरुर तालुकाध्यक्ष प्रवीण चोरडिया, सलून व्यावसायिक संघटना, मिठाई असोसिएशन आदी संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.
व्यापाऱ्यांना व्हॅटसंदर्भात नोटीसा येत आहेत. परवानासंबंधी आता केंद्र शासनाच्या विभागाशी संपर्क करावा लागत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. वीजबिल, जीएसटी आणि इतर अनेक प्रश्न व्यापाऱ्यांना भेडसावत आहेत. आधीच कोरोना व लॉकडाऊनमुळे व्यापारी बेहाल झाला आहे. त्यात हे इतर प्रश्न व्यापाऱ्यांचा त्रास वाढवत आहेत. केंद्र सरकारशी संबंधीत प्रश्नांविषयी केंद्राशी तर, राज्य सरकारशी संबंधीत प्रश्नांविषयी राज्य सरकारबरोबर आपण चर्चा करून व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देऊ, असेही भारतीय म्हणाले.
आपल्या देशाला या भयानक आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचे काम व्यापारीच करू शकतो. म्हणून केंद्र व राज्य सरकारने व्यापाऱ्यांना मदत करावी. व्यापार सुरळीत झाला तर, उद्योगाला चांगले दिवस येतील आणि त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल. केंद्र व राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्या प्रश्नांविषयी गंभीर होऊन निर्णय घेण्याची ही वेळ असल्याचेही ते म्हणाले.
पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांना भेटणार!
महाराष्ट्रातील कोकण, कोल्हापूर, सांगली व सातारा भागात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. या पुरामुळे तेथील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती मिळाली असून आपण प्रत्यक्ष या पूरग्रस्त भागात जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत. व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत करणार आहोत, असेही कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय यांनी यावेळी सांगितले.

