पुणे, ता. १४ : शालेय विद्यार्थ्यांनी चित्रबद्ध केलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील रोमांचकारी महत्त्वाच्या घटनांचा समावेश असणारी दिनदर्शिका डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आली.

ब्रिटिशांचा खजिना लुटणारा काकोरी कट, स्वामी विवेकानंदांचे शिकागो धर्म परिषदेतील भाषण, लाला लजपतराय यांची सायमन कमिशन विरोधातील निदर्शने, सेनापती बापटांचा मुळशीचा सत्याग्रह, बाबू गेनूचे बलिदान, भाई कोतवाल यांचे हौतात्म्य, चंद्रशेखर आझादांचे क्रांतिकार्य, महात्मा गांधींची दांडी यात्रा, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळावर केलेला बॉम्बहल्ला, एनी बेझेंट यांची होमरूल चळवळ, झाशीच्या राणीचा अविस्मरणीय लढा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची ऐतिहासिक उडी या घटनांची चित्रमय माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०२१ ते १४ ऑगस्ट २०२२ असा दिनदर्शिकेचा कालावधी आहे.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने डीईएसने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय स्वातंत्र्य लढा’ या विषयावरील चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. १८५७ ते १९४७ या कालावधीतील घटनांची विषय म्हणून महिनावार निश्चिती करण्यात आली. या घटनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना लक्षात येईल अशा पद्धतीने संदर्भ साहित्याचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ लेखन करण्यात आले. चित्रे काढत असताना सहभागी व्यक्ती, वेशभूषा, प्रसंग, घटनेचा कालावधी आदी आवश्यक बाबींचे सविस्तर स्पष्टीकरण करण्यात आले. स्पर्धेत चौदा शाळांतील २२८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बारा चित्रांची दिनदर्शिकेसाठी निवड करण्यात आली. इतिहास आणि चित्रकला शिक्षकांनी परीक्षण केले. जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापिका शबनम तरडे यांनी समिती प्रमुख म्हणून काम पाहिले.

या वेळी बोलताना डॉ. कुंटे म्हणाले, ‘लाखो कार्यकर्त्यांच्या सहभागातून स्वातंत्र्याचे मंदीर उभे राहिले. हजारो क्रांतिकारकांनी बलिदान केले. स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांचे स्मरण केले पाहिजे. जीवनाला उद्दिष्ट आणि दृष्टी देण्याचे काम शिक्षण संस्थांचे आहे. देशाच्या भवितव्याला उंची देण्यासाठी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचा संकल्प या निमित्ताने प्रत्येकाने केला पाहिजे.’
डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, प्रबंधक डॉ. सविता केळकर, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, आजीव सदस्य प्राजक्ता प्रधान, आनंद काटिकर, प्रसन्न देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे : आर्यन देसाई, श्रीया जोशी, भूमिका दिवटे, सानिका फडतरे, वृषभ बोरगावे, श्रीया प्रभुणे, श्रीपाद सटवे, जिक्रा खान, संकेत कातुर्डे, कुशल रानडे, नील परब, ऐश्वर्या शिंदे

