पुणे प्रार्थना समाज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने व्याख्यान
पुणे : ब्राह्मसमाजाच्या श्रद्धेचा पाया वैदिक एकेश्वरवादाशी जोडलेला आहे. ब्राम्हो समाज एकमेव अशा ब्रह्मस्वरूप परमेश्वरावर म्हणजेच देवावर विश्वास ठेवतो. वेद हे बहुदेववादी आहेत असा समज आहे. परंतु मूळ वेदांमधे एकाच ब्रह्मस्वरूप देवाचे वर्णन अनेक नावांनी केलेले आहे. त्या नावांना अर्थ आहे व तो निरुक्तात स्पष्ट केलेला आहे.ही नावे एकमेव अशा परमेश्वराचे गुण दर्शविणारी आहेत.उदाहरण म्हणून बंदा रविशंकर यांनी “शंकर “-शं म्हणजे ज्ञान व शंकर म्हणजे ज्ञान देणारा-असे स्पष्ट केले.गुणदर्शक नावांना पुढील काळात व्यक्तीस्वरूप दिले गेले व
त्याभोवती अनेक कथा निर्माण करण्यात आल्या,असे मत वेद अभ्यासक बंदा रविशंकर यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस १५२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुणे प्रार्थना समाज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने वेदांचा प्रसार करणारे हैद्राबादचे बंदा रविशंकर यांचे “वेदातील एकेश्वरवाद :ब्राह्मो समाजाचा पाया” या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हे व्याख्यान झाले.
बंदा रविशंकर म्हणाले, वेदांममधूनच तुमचा जीवनाचा उद्देश तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, तुम्हाला कोणी निर्माण केले आहे, तुमच्या सभोवतालचा निसर्ग आणि निर्माणकर्त्याला जाणून घेण्यासाठी वेदांचा अभ्यास करा. विद्या म्हणजे शाळेत जाणे आणि शालेय शिक्षण घेणे, परंतु वैदिक भाषेत विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, ईश्वराच्या संकल्पनेचे ज्ञान, परमात्म्याशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाचे ज्ञान होय,तर जीवनाशी संबंधित इतर सर्व विषयांचे,पदार्थांचे ज्ञान म्हणजे अविद्या होय.
आदि शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र लिहिले असा एक गैरसमज आहे. वेद मंत्र शिकण्याची परंपरा म्हणून ब्रह्मसूत्रे आहेत. आदि शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर टिपण्णी लिहिली. त्यांनी ब्रह्मसूत्रावरील समालोचन सुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

