मुंबई –
वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदांकरिता 34 खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी 12 जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असून उर्वरित 22 जणांच्या नियुक्त्या लवकरच रद्द करण्यात येणार असून भविष्यात अशा बोगस खेळाडू प्रमाणपत्राच्या आधारे भरती होऊ नये यासाठी क्रिडा विभागामार्फत एक आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित केली जाईल, अशी माहिती क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.
शासन सेवेत ज्या 258 कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळवली, त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करण्यात आली विभागामार्फत त्यांच्यावर एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे. याबाबतची पूतर्ता बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य श्रीमती मनिषा कायंदे, श्री.सदानंद खोत यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविणार – गृहराज्यमंत्री सतेज पाटील
महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता शासनाने विशेष भूमिका घेतली आहे. त्यांना विशेष आरोग्य यंत्रणा मिळावी यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पोलिसांकरिता 39 रोगांवर उपचार केले जात आहे. या योजनेत जवळपास 10 हजार पोलीस व कुटुंबांवर उपचार केले असून या उपचाराच्या खर्चापोटी या वर्षात 60 कोटी रूपयांची प्रतिपूर्ती दिली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
सध्या पोलीसांकरिता 39 प्रकारच्या रोगांवर उपचार केले जात आहे. भविष्यात आणखी काही रोगांवर उपचार करण्याचा अंतर्भाव करण्यासंदर्भात बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जाईल. केंद्र सरकारच्या योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्याबरोबर यात असलेल्या काही त्रुटीही दूर करण्यात येतील, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
राज्यातील पोलीस आणि कुटुंबियांच्या आरोग्य सेवेबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, शशिकांत शिंदे, डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला होता.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील भात पिकांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2021 या महिन्यात 786 हेक्टर बाधित झाले असून बाधित 1862 शेतकऱ्यांना 117 लक्ष रूपयांची नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. यापैकी 63 लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
विधान परिषद सदस्य सर्वश्री. डॉ.परिणय फुके, गोपिचंद पडळकर यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.
000
कळमनुरी तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अनुदानात गैरव्यवहार नाही – कृषीमंत्री दादाजी भुसे
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत निवड झालेल्या 42 गावांकरिता ठिबक/तुषार, मोटार व पाईप इत्यादी साहित्यांकरिता मिळालेल्या अनुदानात गैरव्यवहार झाल्याची तक्रार गजानन प्रभाकर लासिनकर व राजकुमार केवलसिंग जाधव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली होती. या प्रकरणी तक्रारदारांनी केलेल्या सहाही मुद्यांची चौकशी करण्यात आली असून यात गैरव्यवहार झाला नसल्याची माहिती कृषीत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या सहाही मुद्यांची माहिती कृषी विभागाने दिली असून तक्रारदारांचे समाधान झाले असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, जयंत पाटील, गोपिनाथ पडळकर यांनी उपस्थित केला होता.
000
बीड जिल्ह्यातील देवस्थान व वक्फ बोर्ड जमिनी चौकशी प्रकरणी एस.आय.टी.ची व्याप्ती वाढवणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
बीड जिल्ह्यातील देवस्थान व वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्री अपहार प्रकरणी एकूण 5 गुन्हे दाखल झाले असून या 5 गुन्ह्यांपैकी 3 गुन्ह्यात आय.पी.एस.अधिकारी श्री.कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
जमीन अपहारप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी अन्य आरोपी हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांना न्यायालयाकडून 8 मार्च 2022 पर्यंत अटक मनाई आदेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. तसेच या गुन्ह्यातील दोन उपजिल्हाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रे उपलब्ध करून घेतली जातील, तसेच गुन्ह्यांची व्याप्ती जास्त असेल तर एस.आय.टी.मध्ये आणखी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून जलद गतीने तपास करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
याबाबत प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विनायक मेटे, अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता.
000
अंमलदार बदली आदेशातील चुकीबद्दल पुणे पोलीस अधीक्षकांकडून दिलगिरी – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
पुणे पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अंमलदार रामचंद्र कानगुड यांची बदली करताना बदली आदेशात अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी संबधित महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेची आणि तिच्या कुटुंबाकडे दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
तसेच अशा प्रकारच्या प्रशासकीय चुका वारंवार होऊ नये व त्यांची चूक सुधारावी यासाठी संबंधितांना लेखी समज दिली असल्याचेही श्री.देसाई यांनी सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य गोपिनाथ पडळकर यांनी उपस्थित केला होता.
000

