महायुतीचा महाविजय….

Date:

पुणे,ता.२३ / विकास वाळुंजकर

“ फिर एक बार मोदी सरकार ” मुद्दा उचलून धरुन तमाम पुणेकर मतदारांनी महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या गळ्यात गुरुवारी प्रचंड मताधिक्याने खासदारकीच्या विजयाची माळ घातली. बापट यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत बापट यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी इंदिरा काँग्रेसचे मोहन जोशी यांचा विक्रमी मतांच्या फरकांनी पराभव केला. निवडणुक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केन्द्राच्या आवारात आज दुपारनंतर उशीराने निकाल जाहीर केला. त्यावेळी बापट यांच्या चाहत्यांसह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय ( आठवले ), रासप, शिवसंग्राम व लोक जनशक्ती पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पक्षाचे झेंडे फडकावीत शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. जंगली महाराज रस्त्यावरील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तसेच कसबा गणपतीसमोरील बापट यांच्या कार्यालयात या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोशपूर्ण वातावरणात विजयोत्सव साजरा केला. पुण्याची ताकद गिरीश बापट, हर हर मोदी घरघर मोदी अशा घोषणा देत बापट यांच्या चाहत्यांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला. बापट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी तसेच त्यांना खासदारकीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यालयात हितचिंतकांची दिवसभर रीघ लागली होती. बापट यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या या लाडक्या नेत्याला खांद्यावर घेऊन विजयाच्या घोषणा दिल्या.

या विजयामुळे गिरीश बापट यांना पुण्यनगरीचे तेरावे खासदार होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा मान इंदिरा मायदेव, काकासाहेब गाडगीळ, नानासाहेब गोरे, एस एम जोशी, शंकरराव मोरे, मोहन धारिया, बँ. विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, अण्णा जोशी, विठ्ठ्ल तुपे, प्रदीप रावत व अनिल शिरोळे यांना मिळाला होता. बापट हे पुणेकरांनी निवडून दिलेलेल भारतीय जनता पक्षाचे चौथे खासदार ठऱले आहेत. २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या या निवडणुकीत दहा लाख चौतीस हजार पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी बापट यांना पसंती दिली. त्यामध्ये युवा व नवमतदारांचे प्रमाण लक्षणीय होते. बापट यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव यांना तर बहुजन समाज पार्टीने उत्तम शिंदे यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही पक्षाची या निवडणुकीत धुळधाण झाली. शहरातील शेकडो संघटना, ज्ञाती संस्था व स्वयंसेवी संस्थांनी बापट यांना समक्ष भेटून तसेच प्रचारात सक्रिय सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला होता. त्यामध्ये पुणे बार असोसिएशन, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, दलित व अल्प संख्यांक संघटना, प्रवासी संघटना, मागासवर्गीय संघटना, कोळी महासंघ, कुंभार समाजोन्नती मंडळ, दिव्यांग संघ, अपंग बचत गट, वडार संघटना, नेपाळी कामगार सेना, संत नामदेव शिंपी समाज, धोबी परीट संघटना, लाँन्र्डी व्यावसायिक संघ, पान असोसिएशन अशांचा समावेश होता. बापट यांच्या विजयात त्यांचाही मोठा वाटा आहे. असे मानले जाते. पक्षांतर्गत गटबाजी आणि मोहन जोशी यांच्या विरोधातील नाराजी यामुळे काँग्रेसकडे मतदारांनी पाठ फिरविली. अशा भावना त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तर बापट यांचा शिस्तबद्ध नियोजित व प्रभावी प्रचार यापुढे काँग्रेसचे मोहन जोशी यांचा टिकाव लागला नाही. असा सूर राजकीय जाणकारांनी निकालानंतर लावला आहे. उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून काँग्रेसचा उमेदवार पराभवाच्या छायेत होता. त्यावर बापट यांच्या विजयामुळे शिक्कामोर्तब झाले. अशा प्रतिक्रियाही विरोधकांच्या वर्तुळात व्यक्त केल्या गेल्या. या निवडणुकीत मुख्यंमंत्री देवेन्द्र फडणवीस, केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुश गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, शहानवाज हुसेन, विजयाताई रहाटकर, डाँ. विनय सहस्त्रबुध्दे, माधव भांड़ारी, महादेव जानकर यासारखे नेते हिरीरीने उतरले होते. त्यांनी जाहीर सभातून महायुतीचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचविला. त्या तुलनेत विरोधकांकडे असे धडाडीचे नेते अभावानेच दिसले. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे राजकीय बलाबल या मुद्याचा विचार केल्यास या निवड़णुकीत काँग्रेस पक्ष पिछाडीवरच होता हे स्पष्ट होते. एक केन्द्रीय मंत्री, एक खासदार, सहा आमदार, महाराष्ट्राचे दोन मंत्री, चौसष्ठ नगरसेवक अशी ताकद गिरीश बापट यांच्या मागे उभी होती तर काँग्रेसचे मोहन जोशी यांच्या मागे विधान परिषदेचे दोन आमदार व नऊ नगरसेवक एवढी मर्यादित शक्ती होती. . इथेच ही लढाई एकांगी होणार हे स्पष्ट झाले होते. बापट यांच्या जमेच्या बाजूलाही खूप मुद्दे होते. पालकमंत्री म्हणून त्यांनी मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्टसिटी, आदी योजना पुणेकरांना मिळवून दिल्या. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे नेटवर्क, घटक पक्षांशी चांगले संबंध, सतत उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा या जमेच्या बाजू बापटांना मताधिक्य मिळवून गेल्या. पुणे लोकसभा मतदार संघात उज्वला गँस योजनेचा लाभ ९६०० महिलांना मिळाला. आयुष्मान भारत योजनेखाली सव्वा लाख कुटुंबांनी वैद्यकीय मदतीचा लाभ घेतला. मुद्रा योजनेतून त्र्याहत्तर हजार लोकांना रोजगार मिळाला. मातृवंदनेतून २५६४ स्त्रीया लाभार्थी झाल्या. व पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी म्हणून ९२ हजार पुणेकरांची नोंद झाली आहे. ही माहिती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात प्रचारात आणली. त्याचा फायदा बापट यांना झाला. मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा भरपूर वावर. लोकसभा निवडणुकीचा यापूर्वीचा अनुभव. पुण्याच्या प्रश्नाची चांगली जाण. बहुजन मुस्लीम व दलित समाजाशी चांगला संपर्क हे जमा बाजूला असलेले मुद्दे मोहन जोशी यांना उपयोगी पडले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस या त्यांच्या मित्र पक्षाने त्यांना फारशी मदत केली नाही. हेही त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण मानले जाते. पक्षांतर्गत गटातटाला एकत्र करून प्रचाराला लावण्यात मोहन जोशी यांना यश मिळाले नाही. पक्षाची शहरातील झालेली पडझड. युवा आणि नव मतदारांशी संपर्क साधण्यात झालेली पीछेहाट हे मुद्दे जोशी यांच्या विरोधात गेले. त्यांना दारुण पराभव स्विकारावा लागला. आत्तापर्यंतच्या पुण्याच्या इतिहासातील हा सर्वात लांछनास्पद पराभव मानला जातो. या निवडणुकीत घसरलेली मतांची टक्केवारी हाही चर्चेचा विषय झाला होता. परंतु त्याचा महायुतीच्या मतांवर फारसा परिणाम झाला नाही. हे आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकूणात विचार केला तर राज्यात ठिकठिकाणी कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे. पुणे लोकसभा मतदार संघात मतदार याद्यांमधील त्रुटी, झोपडपट्यातील उदासीनता आणि कडक उन्हाळा ही तीन कारणे मतदानाची टक्केवारी घटण्यासाठी कारणीभूत ठरली असे म्हणता येईल. नरेन्द्र मोदी, अमित शहा, राहूल गांधी, प्रियांका गांधी असे राष्ट्रीय स्टार प्रचारक पुण्यात फिरकले नाहीत हेही एक कारण सांगितले जाते. ते खऱे असले तरी ४९.८४क टक्के इतके कमी मतदान हे महायुतीला त्रासदायक ठरू शकते असे भाकित माध्यमांनी केले होते. ते मात्र खऱे ठऱले नाही. प्रत्यक्षात तसे झाले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे महायुतीच्या वाँर रुममधील तज्ञांनी या घटकाचा आधीच मागोवा घेतला होता. २०१४ च्या निवडणुकीत कँन्टोन्मेट, वडगाव शेरी व शिवाजीनगर मतदार संघात ज्या ठिकाणी पन्नास टक्यांपेक्षा कमी मतदान झाले होते अशा ४५५ केन्द्रांवर महायुतीने लक्ष केन्द्रीत केले होते. याच केन्द्रांवर काँग्रेस राष्ट्रवादी व मनसेला अधिक मते मिळाली होती. ही बाब लक्षात घेऊन महायुतीने या परिसरात व्यूहरचना केली होती. त्या परिसरातील मतदारांवर सर्वाधिक लक्ष केन्द्रीत करण्यात आले होते. त्याचा फायदा झाल्याने या केन्द्रांवर महायुतीला मताधिक्य मिळाल्याचे आज स्पष्ट झाले. पुणेकरांनी कंटाळा केला या आरोपातही फारसे तथ्य नसल्याने आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. टक्केवारीत मतदान घटल्याचे दिसत असले तरी संख्यात्मक विचार करता मागील निवडणुकीपेक्षा यावेळी तब्बल चाळीस हजारांनी अधिक मतदान झाल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत नऊ लाख ९४ हजार ६२४ पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला होता यावेळी त्यात भर पडली. दहा लाख चौतीस हजार मतदारांनी मतदानात भाग घेतला.

निवडणुक शांततेत पार पडली. हा सर्वात महत्वाचा मुद्दा पुण्याची राजकीय जाण दर्शविणारा ठरला. या कालावधीत आचारसंहिता भंगाच्या सुमारे साडेचारशे तक्रारी दाखल झाल्या. निवडणुक आयोगाने सी-व्हिजिल नावाचे अँप प्रथमच यावेळी सादर केले. मतदारांनीही त्याचा तक्रारी दाखल करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. हे या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ठ्य ठरले. बापट यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला. बापट यांनी त्याकडे दुर्लक्ष करून सबका साथ सबका विकास यावर भऱ दिला. बापट आणि जोशी यांच्या प्रचाराची तुलना करायची झाल्यास बापट यांच्या प्रचारात सुसंस्कृतपणा सभ्यता असल्याचे जाणवत होते तर जोशी यांच्या प्रचारात भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात आणून व्यक्तीगत शिंतोडे उडविण्याची स्पर्धा असल्याचे जाणवत होते. जोशी यांच्या आरोपात नवीन काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचा प्रचार हा पराभूत मानसिकता दाखवीत होता. असे राजकीय धुरीणांना पहिल्यापासूनच वाटत होते.

विकासाचा मुद्दा महायुतीने जितक्या जोरकसपणे प्रचारात आणला त्या तुलनेत काँग्रेसला तो पुढे आणता आला नाही. महायुतीने दोन जाहीरनामे मतदारांसमोर आणले. पहिल्या जाहीरनाम्यात शेतकरी कामगार वर्गाला महायुतीने भरभरून आश्वासने दिली. समान नागरी कायदा लागू करणार अशी घोषणा करून महायुतीने सर्व धर्मीयांना नवा संदेश दिला. एक लाख रुपयांचे कर्ज पहिल्या पाच वर्षांसाठी बिनव्याजी देऊ असा संदेश महायुतीने गरीबांपर्यंत पोहोचविला. दहशतवादाबाबत झिरो टाँलरन्सची भूमिका महायुतीने जाहीर केली. राम मंदिराचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडविण्याचा इरादा जाहीर केला. छोट्या व्यापा-यांसाठी पेन्शन योजना, शेतक-यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये सन्मान योजना, तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा, पाण्याच्या प्रश्नासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय, शेतीमध्ये तब्बल पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणुक, सिंचन क्षमतेत वाढ, मोठ्या शहरातून शेतक-यांसाठी बाजारपेठा, नल से जल योजना अशा मूलभूत समस्यांना हात घालून महायुतीने पुणेकर मतदारांसमोर विकासाचा अजेंडा मांडला. दुस-या जाहीरनाम्यात महायुतीने पुण्यातील नागरी प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा मुद्दा कँश केला. काँग्रेसला मात्र त्यांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविता आला नाही. हे बापट यांच्या विजयाचे आणखी एक रहस्य मानले जाते. काँग्रेसने पुण्यातील पाणीकपात हा मुद्दा कँश करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात पाणीकपात झालीच नाही. पाटबंधारे खात्यानेही त्याबाबत सतत अपडेटस जाहीर केले. गिरीश बापट यांनी या प्रश्नाचे कुणी राजकारण करू नये असे आवाहन करून पाण्याच्या नव्या प्रकल्पाची माहिती वेळोवेळी जाहीर केली. चोवीस बाय सात आणि भामा आसखेडचे पाणी या दोन योजना महायुतीने पुणेकरांपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे विरोधकांना या निवडणुकीत फारसे मुद्देच हाती लागले नाहीत. असे स्पष्ट होत गेले. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फार मोठा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाला लागलेली घरघर या निवडणुकीत अधिकच खोलवर गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या त्रेसष्ट वर्षाचा इतिहास पाहाता तब्बल एकोणचाळीस वर्षे पुण्यात काँग्रेसचा खासदार होता. चौदा वर्षे इतर पक्षाच्या खासदाराला पुणेकरांनी संधी दिली. १९९१ मध्ये पहिल्यांदा पुण्यात कमळ फुलले. त्यानंतर १९९९ मध्ये प्रदीप रावत १२.४८ टक्के मताधिक्याने निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी पुण्यात भाजपाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर बापट यांच्या आजच्या विजयाने पुणे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. या मुद्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यावरची काँग्रेसची पकड ढिली तर झालीच परंतु हा मतदार संघ त्यांच्या हातून कायमचा गेला की काय या चर्चेला या निमित्ताने सुरुवात झाली.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास १९७५ आणीबाणीपासून सुरु झाला असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. आणीबाणीत कारावास संपवून बापट पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी शनिवार वाड्यावरील जाहीर सभेत अतिशय प्रभावी भाषण केले. दिल्लीत जाऊन मी पुणेकरांचे प्रश्न हिरीरीने मांडेन असे. या सभेत त्यांनी जाहीर केले होते. सुमारे त्रेचाळीस वर्षांपूर्वीचे त्यांचे ते भाषण पुणेकरांच्या आजही स्मरणात आहे. साडेतीन तपांची तपश्चर्या केल्यावर या सभेतील बापट यांचे शब्द आज खरे झाले आहेत. ते आता खासदार झाले आहेत. त्यांचे खास अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस पुणेकरांतर्फे शुभेच्छा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...