पुणे, ता. २७ ः पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदासाठी अनुभवी, सक्षम आणि पूर्ण वेळ अधिकार्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मु‘यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
सर्वसामान्य रुग्ण उपचारांसाठी ससून रुग्णालयावर अवलंबून असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ससून रुग्णालयावरील ताण वाढलेला आहे. ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सक्षम अधिकार्याची तातडीने गरज असल्याचे मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.
डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर ससूनमधील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांचे मनोधैर्य खचले आहे. या सर्वांनी या विषयीच्या भावना कृतीतून आणि पत्र लिहून सरकारकडे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.
पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी राज्य शासनाने बदली केली. सध्या त्यांचा पदभार रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.

