पुणे : भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे तसेच शहरातील आमदारांचीही नावे वगळण्यात आले आहे. यामुळे जुने निष्ठावंत पण सत्तेतील अधिकारग्रहणापासून दूर राहीलेले आणि नंतर येवून म्हणजे ज्युनिअर असून सत्तेत बरेच काही मिळविलेले अशा दोन गटात सुप्त खेचाखेची सुरु असल्याचे खाजगीत बोलले जाते आहे .
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,पालकमंत्री गिरीश बापट तसेच पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीच नावे या पत्रिकेत आहेत. हे तिघेही पुण्यातील भाजपचे जुने जाणते ज्येष्ठ निष्ठावंत मानले जातात .
येत्या ६ एप्रिलला पक्षाचा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातून किती कार्यकर्ते जाणार, कोण नेणार याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार व नगरसेवक यांच्यात जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद झाले होते. तसेच पक्षाच्या १०१ नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक, खासदार काकडे या बैठकीला अनुुपस्थित होते. त्यावरून पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे.
मुंबईतील कार्यक्रमानंतर पुण्यात ८ एप्रिलला कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रमणबाग येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे .त्यावेळी केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौर तसेच महापालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे.
एकीकडे पक्षात सत्ता असल्यामुळे सिनिअर आणि ज्युनिअर अशी दरी पडलेली असताना नगरसेवक आणि आमदार अशीही दरी दिसून येते आहे. नगरसेवकांच्या कामांच्या आधारे आणि महापालिकेच्या बजेटवर आमदारांनी श्रेय लाटूनये त्यांनी स्वतंत्र पाने आपापल्या विधानसभा मतदार संघात आपापल्या परीने कामे करावीत असे नगरसेवकांचे मत आहे .तर महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडून पक्ष संघटनेबाबत जेवढी जबाबदारी घेणे गरजेचे आहे तेवढी घेतली जात नसल्याचे बोलले जाते आहे .