पुणे, महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराच्या विकासाला खिळ बसल्याची टीका भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी केली.
आज बीआरटीच्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाला दहा वर्षे पूर्ण झाली. परंतु ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकल्प अपयशी ठरला. भाजपच्या वतीने स्वारगेट-कात्रज-हडपसर या मार्गावर मानवी साखळी करून राष्ट्रवादीचा निषेध करण्यात आला. यावेळी श्री. गोगावले बोलत होते.
श्री. गोगावले म्हणाले, ‘बीआरटीचा देशातील पहिला प्रकल्प म्हणून खूप गाजावाजा करून तो सुरू करण्यात आला. परंतु भ‘ष्टाचार, राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव, कामाचा निकृष्ट दर्जा आणि नियोजनशून्य कारभारामुळे प्रकल्प पूर्ण करताना त्रुटी राहिल्या, त्यामुळे पुणेकरांना गतीमान, सुलभ आणि सुरक्षित बससेवा देण्यात अपयश आले.’
गोगावले पुढे म्हणाले, ‘स्वारगेट-कात्रज-हडपसर मार्गावरील बीआरटी सुरू झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपुल बांधण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागला. या प्रकल्पावर खर्च केलेले पुणेकरांचे शंभर कोटी रुपये पाण्यात गेले. हा मार्ग अपघातांचा सापळा बनला.’
प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प सपशेल अपयशी ठरला असताना शहरातील तीन मु‘य रस्त्यांवर बीआरटी प्रकल्पांचे काम झाले आहे. परंतु या तीनही मार्गावर आधी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती झाली असून, त्यामुळे हा मार्ग असुरक्षित झाला आहे. शहराच्या वाहतुक कोंडीत वाढच होत आहे. या संपूर्ण प्रकल्पावर खर्च झालेले एक हजार कोटी रुपये वाया गेले आहेत. महापालिकेत सत्तेत आल्यावर भाजप या संपूर्ण प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असून, गतीमान, सुलभ आणि सुरक्षित बससेवा देण्यास कटिबध्द असल्याचे गोगावले यांनी पुढे सांगितले.
आमदार भीमराव तापकीर, सरचिटणीस दीपक मिसाळ, गणेश घोष, महिला अध्यक्षा शशिकला मेंगडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, कार्यालयमंत्री उदय जोशी, नगरसेविका मुक्ता टिळक, मनिषा घाटे, मंजुषा नागपुरे, धनंजय जाधव, वर्षा तापकीर, प्रविण चोरबेले, डॉ. भरत वैरागे, दिलीप काळोखे, प्रतिभा ढमाले, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, अरुण राजवाडे, सुभाष जंगले, हरिष परदेशी, संतोष राजगुरू, जयप्रकाश पुरोहित, गणेश भिंताडे, गिरीश खत्री, आशाताई बिबवे, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.