पुणे – भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवारांनी आज शिवछत्रपतींच्या साक्षीने सुराज्याची शपथ घेत, महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला. पारदर्शक, गतीमान, भ‘ष्टाचारमुक्त, विकासाभिमुक सुशासन देण्यासाठी कटिबध्द असल्याची शपथ उमेदवारांनी घेतली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवी भुसारी, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, आमदार मेधा कुलकर्णी, आरपीआयचे नवनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवछत्रपतींच्या जयजयकारात आणि सनई, चौघडा व तुतारीच्या निनादात गडावर भालदार चोपदारांच्या उपस्थितीत हा मंगलमय शपथ सोहळा झाला. सिंहगडावरील चारही दरवाजांना सुराज्याचे तोरण बांधण्यात आले होते. यावेळी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला.
सकाळी गडावरील कोंडणेश्वर व अमृतेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि राजाराम महाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात आले.
केंद्र, राज्य आणि नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली, त्याचप्रमाणे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष बनेल असा विश्वास पक्षाचे खासदार दानवे-पाटील यांनी व्यक्त केला. प्रचारात आरोप-प्रत्यारोप न करता विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी महापालिकेतील विजयासाठी कामास लागावे, असे आवाहनही त्यांनी केली.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी आघाडीने शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समस्या कमी न होता वाढतच गेल्या, त्यांच्याकडे विकास करण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती नाही. दोन-अडीच वर्षात केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शहराच्या विकासाबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी सुरु केली. त्यामुळे पुणेकरांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली असून, पक्षाचा विजय निश्चित आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे व त्याला ताकद देणे हेच आमचे काम असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार शिरोळे म्हणाले तिकीट वाटपाबाबत आता नाराजी उरलेली नाही, मतभेदही नाहीत. सर्वांनी जोरदारपणे काम करावे. खासदार काकडे म्हणाले पक्षाचा विजय नक्की आहे. समाजातील सर्व घटकांना उमेदवारी दिली असून येत्या निवडणुकीत किमान १०० जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी शपथ दिली व सूत्रसंचालन केले.