प्रविण दरेकरांची मागणी
मुंबई, दि. २१ एप्रिल – राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनिक हलगर्जीपणा याला कारणीभूत असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी प्रतिक्रिया आज विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी दिली. दरेकर तातडीने नाशिककडे रवाना झाले असून ते घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेणार आहेत, तसेच मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेणार आहेत.नाशिकला निघण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी आहे, मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे, प्रशासनाचा हलगर्जीपणा तर दिसतो आहेच पण या राज्यात व्यवस्थेचे आणखी किती बळी जाणार आहेत, असा प्रश्न निर्माण होतो. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.
प्रविण दरेकर म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी, गंभीर आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. त्यामुळे मी तातडीने नाशिकला जाण्याचा निर्णय घेतला आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर अधिक भाष्य करता येईल.
नाशिक ऑक्सिजन गळती घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
Date:

