पुणे-महाजनादेश यात्रेला पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात सर्वत्र जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या व राज्यातील भाजपा महायुती सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचे जाणवते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला अभूतपूर्व विजय मिळवून देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुणे येथे व्यक्त केला.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री बाळा भेगडे, खा. गिरीश बापट, खा. संजय काकडे, खा. विकास महात्मे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, प्रदेश सचिव राजेश पांडे व शहराध्यक्ष आ. माधुरी मिसाळ ,आ. जगदीश मुळीक,महापौर मुक्ता टिळक ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,सुनील माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाजनादेश यात्रेने शनिवारी पुणे शहरात प्रवेश केला. त्यानंतर चार तास पुणेकरांनी यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद दिला तो आपल्या आयुष्यातील अभूतपूर्व आहे. त्याबद्दल आपण पुणेकरांचे आभारी आहोत. पुणे जिल्ह्यातील बारामती, भिगवण या ठिकाणांसह सर्वत्र अपेक्षेपेक्षा जास्त जनसमर्थन मिळत आहे. सर्वसामान्य लोक रस्त्यावर येऊन उत्स्फूर्तपणे महाजनादेश यात्रेचे स्वागत करत आहेत. आपल्या अडचणी सोडविण्याची क्षमता केवळ भाजपा महायुती सरकारकडेच असल्याचा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे. महाजनादेश यात्रेने 3,018 किलोमीटर प्रवास केला असून राज्यातील 107 विधानसभा मतदारसंघांना भेट दिली आहे व सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
महाजनादेश यात्रेला नियोजनापेक्षा उशीर झाल्यामुळे सायंकाळी वाहतूक अधिक असताना पुण्यात यात्रा आली. यात्रेसाठीच्या गर्दीमुळे वाहतुकीची गैरसोय झाली, त्याबद्दल आपण दिलगीर आहोत, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, भाजपा महायुती सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली. पुणे मेट्रोची उभारणी सुरू झाली, रिंग रोडचे काम मार्गी लागले, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या एचसीएमटीआर प्रकल्पाचे टेंडर अंतिम टप्प्यात आहे, विमानतळ विस्तारातील अडचणी दूर केल्या आहेत, नवा विमानतळ उभारणीसाठी कंपनी तयार झाली असून लवकरच भूमीसंपादन सुरू होईल. केंद्र सरकार, राज्य सरकार व पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून पुणे शहरासाठी सुमारे 45,000 कोटींचे विकासप्रकल्प होत आहेत. पुणे आणि पिंपरी – चिंचवड हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. या भागात अधिकाधिक गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा महायुतीच्या विकासकामांमध्ये सिंचन प्रकल्पांचा वाटा मोठा आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील अनेक बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला व कामे सुरू आहेत. जुन्या सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मंत्री असूनसुद्धा ही कामे होत नव्हती. आपल्या सरकारच्या कामामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचाही भाजपावर विश्वास आहे.
‘आरे मेट्रो कारशेड’ विषयी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू
मुंबईतील आरे येथे मेट्रोची कारशेड उभारण्यास होत असलेल्या विरोधात शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाल्याबद्दल एका पत्रकाराने विचारले असता मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, झाडांची कत्तल करणे आम्हालाही मंजूर नाही आणि आपल्या सरकारने वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी काम केले आहे. पण मा. आदित्य ठाकरे यांनी याबाबत वस्तुस्थिती समजून घ्यावी. आरे कारशेड उभारणीबाबत हरकती सूचना मागविल्या असता 13,000 हरकती आल्या आणि त्यापैकी 10,000 बंगलोरमधील एकाच वेबसाईटवरून आल्या होत्या. कारशेड प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांच्या मागे कोण लोक आहेत आणि त्यांच्या मनात काय दडले आहे, हे समजून घ्यायला हवे. कारशेडविषयी सर्वोच्च न्यायालयात खटला चालला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की ही वनजमीन नाही, तेथे जैववैविध्य नाही, तेथे कारशेडला परवानगी देता येते आणि पर्यायी ठिकाणाचा विचार करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मेट्रोचे काम चालू आहे. या प्रकल्पासाठी निधी देण्यापूर्वी जपाननेही एक वर्ष पर्यावरणविषयक अभ्यास करून खात्री करून घेतली. कारशेड उभारण्यापूर्वी 23,000 झाडे लाऊन चार वर्षे जगवली आहेत आणि आता नव्याने सुमारे 13,000 झाडे लावत आहोत. मेट्रो हा कार्बन फुटप्रिंट कमी करणारा प्रकल्प असून कुलाबा ते सिप्झ या मेट्रोमुळे जेवढे प्रदूषण कमी होईल तेवढ्या प्रमाणात कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी मुंबईत दोन कोटी वृक्ष लावावे लागतील. याविषयी आपण आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू.
महाजनादेश यात्रेला प्रचंड प्रतिसाद, भाजपा महायुतीला निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
Date:

