पुणे: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने एनजीओ ह्यूमॅनिटी-अ हेल्पींग हँड फौंडेशनच्या सहयोगाने “ह्यूमॅनिटी इंटरनॅशनल विमन अचिवर्स अवॉर्ड्स 2018”चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन समाज आणि देशासाठी विशेष योगदान देणार्या महिलांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निर्माता आणि दिग्दर्शक फर्ज खान याने केले. कार्यक्रमात एकूण 26 महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रसिध्द गायिका कविता सेठ, अनामिका ग्रोवर, शिवानी वासवानी, आरजे श्रुतीका कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सेटलवाड, व्हायोलिन वादिका अनुप्रिया देवताळे, भारतीय कवयित्री आणि लेखिका निलम सक्सेना चंद्रा आणि इतर महिलांचा समावेश होता. (खाली पुरस्कार विजेत्या महिलांची संपूर्ण यादी) महिला सबलीकरणाबाबत जागृती करण्यासाठी 7 खंडांमधील 45 देशांमध्ये 1 लाख किलोमीटर्सचा प्रवास करणार्या आणि पुण्यात स्थायिक असणार्या डॉ. मारल वाजर्लू यांना कार्यक्रमात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी सांगितले की, “आज आम्ही विविध क्षेत्रात महान कामगिरी करणार्या महिलांचा गौरव करत आहोत. या पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून इतर महिलांनाही बाहेर पडून आपापल्या क्षेत्रात उल्लेख़नीय काम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.

