पुणे- महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल खंत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे जागतिकीकरणाचे परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले.माझे वडील आणि एस. एम. जोशी या दोन ‘अण्णां’मुळे मी घडलो, अशी भावना देखील यावेळी वैद्य यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संवाद पुणेतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ९० व्या वर्षांतील पदार्पणानिमित्त भाई वैद्य यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी महापौर अंकुश काकडे, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, सचिन इटकर आणि सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले ,जनसंघ आणि समाजवादी यांना बरोबर घेऊन स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल सरकारमध्ये भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते. आमचे मंत्रिमंडळ मोठे गमतीचे असले तरी अडीच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय त्या काळात झाले. गृह खात्याबरोबरच सामान्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात की नाही याकडे भाईंचा कटाक्ष असायचा. अनेक वर्षे मंत्री राहण्यापेक्षा अल्पकाळच्या मंत्रिपदामध्ये भाईंनी आपल्या कर्तृत्वाचा आणि दृष्टीचा ठसा उमटविला,
ते पुढे म्हणाले ,न आक्रमणाच्या काळात जनतेमध्ये जागृती घडविण्याबरोबरच सामाजिक ऐक्यासाठी महाविद्यालयीन युवकांच्या समितीचे भाई अध्यक्ष होते आणि मी सचिव. माझे सामाजिक कामाचे पहिले पाऊल भाईंच्या नेतृत्वाखालीच पडले, अशी आठवण सांगून पवार म्हणाले, समाजवादी असल्याने त्यांच्या बैठका काकाकुवा मॅन्शनमध्ये चालायच्या, तर आमच्या काँग्रेस भवनमध्ये. एस. एम. जोशी यांचा प्रभाव असलेले भाई तत्त्वाने चालणारे, तर लोकांचे काम करण्यासाठी खुर्चीकडे आमचे लक्ष असायचे. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार कसा करायचा हे भाईंच्या महापौरपदाच्या काळात पुणेकरांनी अनुभवले. राज्याच्या सत्तेमध्ये बदल झाला तेव्हा उत्तमराव पाटील, निहाल अहमद, हशू आडवाणी असे सहकारी होते. आपण कधी मंत्री होऊ हे त्यांना स्वप्नातही वाटले नसते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे संप होत असत. आम्ही केंद्राप्रमाणेच वेतन आयोग लागू केल्यामुळे १९७८ पासून राज्यातील कर्मचाऱ्यांचा कधी संप झालेला नाही.
एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधू दंडवते यांच्याबरोबर भाईंनी दीर्घकाळ काम केले. चंद्रशेखर यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नियोजन भाईंनी केले होते. जगामध्ये समाजवादी विचारांचे पतन झाले असले तरी भाईंची विचारांची निष्ठा ढळली नाही. स्वच्छ, उत्तम चारित्र्य, विविध समाज घटकांविषयी आस्था आणि व्यापक समाजहिताचा निर्णय करणारा नेता म्हणजे भाई वैद्य. उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाईंचे प्रयत्न अविरत सुरू राहतील, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.