पुणे– ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि समाजातील वंचित -उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात श्री. भाई वैद्य यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. मुल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते याचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने राज्यातील विविध सामाजिक चळवळींचा अध्वर्यू आपण गमावला आहे.
– गिरीश बापट ( पालकमंत्री पुणे)
ज्येष्ठ समाजवादी नेते व मानवतेची मूल्ये जतन करणाऱ्या भाई वैद्य यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अस्वस्थ झालो. भाईंनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगिकारले होते. गोरगरिबांच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर येऊन लढा उभा करणारे भाई पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. स्वातंत्र सैनिक, गोवा मुक्ती आंदोलनातील नेता शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारा पुणेकरांचा मित्र आज आपल्यातून नाहीसा झाला आहे. महापौर या नात्याने त्यांनी पुणे शहराचा नावलौकिक सर्वदूर पोहचवला. राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांची कामगिरी महाराष्ट्रातील जनतेच्या सदैव स्मरणात राहील. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, पोलीस दलाचा बदललेला पोशाख, सेवानिवृत्तांना त्यांनी मिळवून दिलेला आर्थिक लाभ महाराष्ट्रातील जनता कधीच विसणार नाही. भाई वैद्य यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
-अंकुश काकडे (माजी महापौर)
भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला,निस्पृह,सतत लोकांसाठी चळवळ करणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रला ओळख कायम लक्षात राहील,नगरसेवक,महापौर, मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आजही आदर्श अशी होती,अनेकवेळा त्यांचे मला मार्गदर्शन मिळाले,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर-
भाई वैद्य यांच्या निधनामुळे एक समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवणारा नेता हरपला. भाई वैद्य आयुष्यभर आपल्या समाजवादी विचारांशी ठाम राहिले आणि शेवटपर्यंत सक‘ीय राहीले.
रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करावे यासाठी पाडव्याच्या दिवशी मी जेव्हा पुण्यात होतो ते माझ्याकडे आले होते. राष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला.
त्या दिवशी एका सहकार्याला ङ्गोन करायचा होता, त्याचा नंबर कोणालाच आठवत नव्हता, पण माजी शिक्षक आमदार ठाकरे यांचा नंबर भाईंनी बरोबर सांगितला.
आणीबाणीविरोधात तुरुंगात आम्ही एकत्र होतो तेव्हापासून आमचा स्नेह कायम राहीला. त्यांना विनम‘ श्रध्दांजली.