आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर
पुणे – गेले दोन दिवस साखर संकुलासमोर सुरु असलेले ‘झोपडी निवास आंदोलन’ चिघळण्याच्या मार्गावर आहे. आज दिनांक 11ऑक्टोबर गुरुवार रोजी साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली असता कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अद्याप केवळ आश्वासनच मिळत असल्याने आंदोलन याहीपेक्षा तीव्र केले जाईल असा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांनी दिला आहे.
एन.एस.एल.शुगर्स लि.युनिट ।।। संचलित जय महेश साखर कारखाना पवारवाडी ता.माजलगाव, जि.बीड व्यवस्थानाने ऊस बीलाची रक्कम अद्याप दिली नसल्याने शेकडो शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. जय महेश साखर कारखान्याच्या पिळवणूकीच्या विरोधात आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु ठेवले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जय महेश साखर कारखान्याने ऊस बिलाची रक्कम दिली नसल्याने शेतकरी उघड्यावर पडले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गेल्या दोन दिवस पुण्यातील साखर संकुलासमोर ‘झोपडी निवास आंदोलन’ हे अभिनव आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी प्रशासनाकडून मात्र ठोस आश्वासन किंवा कोणतीही हमी दिली जात नसल्याने हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान आज साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी आंदोलनातील शिष्ट मंडळाशी चर्चा केली मात्र या चर्चेतून शेतकऱ्यांच्या हाती काही ठोस लागले नसल्याने हे आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत असून शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात ठोस आश्वासन व हमी पडल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अप्पासाहेब जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आयुक्तांशी चर्चा दरम्यान शिष्टमंडळात सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव, राजश्रीताई जाधव, सिता शेंडगे, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, माऊली शेंद्रे, मतिंद्र शिंदे, गोविंद शेंडगे आदींची उपस्थिती होती. तसेच या आंदोलनास संजय महाद्वार, सुशिल पिंगळे, रामराजे सोळंके, बाळासाहेब मेंडके, अॅड.दत्ता रांजवण, दासु बादाडे, संदीप माने, सय्यद, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, लक्ष्मण सोळंके, रामदास ढगे, फारुक सय्यद, महादेव लंगडे, रामेश्वर काशिद, कचरु बढे, बळीराम भले, राहुल कोल्हे, ज्ञानेश्वर खराडे, विजय नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसैनिक यांनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जय महेश साखर कारखान्याची मालमत्ता विक्री वरील स्थगिती उठवली असून साखर आयुक्तांनी बीड जिल्हाधिकारी यांना या आदेशाचे पत्रही काढले आहे. स्थगिती जरी उठवली असली तरी चालेल परंतू कारखान्याने शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी.ची रक्कम मिळाल्याशिवाय शिवसेना या आंदोलनातून माघार घेनार नाही. असा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आप्पासाहेब जाधव यांनी दिला आहे.