राष्ट्रीय पंचायत संसदेचा समारोप
गोवा विधानसभा, गोवा राज्यसरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजन
पुणे, १२ नोव्हेबर:“ग्रामीण क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ही राष्ट्रीय सरपंच संसद अत्यंत महत्वपूर्ण आहे. गावाच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक सरपंचांनी मॉडेल व्हिलेेजची संकल्पना साकार करतांना औषधी वनस्पती लावून त्यावर संशोधन करा. प्रत्येक गाव हे आत्मनिर्भर करा.” असे विचार अरूणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व निवृत्त लष्कर प्रमुख जनरल जे.जे.सिंग यांनी व्यक्त केले.
गोवा विधानसभा, गोवा सरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, डोना पावला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पंचायत संसदे’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, मुख्य सचिव परिमल राय आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संकल्प संघई हे उपस्थित होते.
जे. जे. सिंग म्हणाले,“हवा, वायू आणि पाणी हे वाचविले तर हा देश सर्वात प्रगत होईल. या देशाला ५ हजार वर्षाची सभ्यता आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही बैलगाडीपासून सुरू केलेला प्रवास रॉकेट पर्यत येऊन पोहोचला आहे. पण त्याबरोबरच गावाच्या विकासाकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. गोवा येथील अलडोना हे गाव जगातील सर्वात सुंदर गाव म्हणून गणले जाते. त्यामुळे आता गोवावासियांनी बीच बरोबरच आपल्या गावाला अतिशय सुंदर करुन देशात नाव लौकिक करा. येथील लोकांनी सेंद्रीय शेती करून औषधी वनस्पती लावा आणि त्यावर संशोधन करा.”
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले,“ गावाचा विकास करतांना त्यांच्या बहुअंगाने विकासाची भूमिका मांडावी. त्यासाठी गावातील सरपंच आणि त्यांच्या बरोबर स्वयंपूर्ण मित्र हे कार्य यशस्वी पणे पार पाडत आहेत. स्वयंपूर्ण मित्रामुळे गोव्यात खूप मोठे बदल दिसत आहे. गावाचा शाश्वत विकास हा अत्यंत महत्वपूर्ण मुलमंत्र आहे. ग्रामपंचायती बरोबर योग्य नियोजन करुन हा विकास केला जात आहे. राज्यातील अधिकारी आपल्या सुट्टी दिवशी ग्रामीण क्षेत्रात सेवा देत आहेत. येथे कौशल्य पूर्ण व्यक्ती निर्माण करण्यावर भर देऊन पुढील १० वर्षात याचे परिणाम समोर येतील.”
यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशातील विविध राज्यातील सरपंचांचा तसेच गोव्यातील सरपंच व पंचांचा विशेष सत्कार केला
प्रा. डॉ. गौतम बापट व प्रा.पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले.

