- रस्ते खोदाई करणाऱ्या कंपन्यांची थकबाकी वसूल करावी – संदीप खर्डेकर यांचे आयुक्तांना आवाहन.
पुणे- कोरोना काळातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेने उभारी घ्यायला सुरुवात केली आहे.याचा परिपाक विविध क्षेत्रात दिसत असतानाच पुणे मनपा प्रशासनाने केबल कंपन्यांसह अनेकांना सर्वत्र खोदाई ची परवानगी दिल्याने मनपा ला मोठा महसूल मिळेल व ह्या अतिरिक्त उत्पन्नातून शहरातील अनेक विकास कामे मार्गी लागतील असा उदात्त हेतू महापालिकेचा आहे. मात्र ह्या परवानग्या दिल्या जात असताना काही बाबींचा विचार किंवा नियोजन केल्याचे दिसून येत नाही.तरी खोदाई ची परवानगी दिलेल्या सर्व केबल कंपन्या व पथ विभागाला खालील सूचना द्याव्यात अशी आग्रही मागणी भाजपचे प्रवक्ते व क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे .खर्डेकर यांनी पत्रात महत्वाचे मुद्दे मांडले आहेत कि,खोदाई ची पद्धत व वेळा निश्चित कराव्यात परवा रात्री ११ वाजता म्हात्रे पूल ते राजाराम पूल डी पी रस्त्यावर शुभारंभ लॉन समोर खोदाई केली जात होती.या ठिकाणी नागरिकांनी तक्रार केल्यावर संबंधित व्यक्ती काम अर्धवट टाकून पळून गेली.या बाबतीत आपल्या पथ विभागात तक्रार केली असता अद्यापपर्यंत ना कारवाई ना कोण काम करत होते याची माहिती पथ विभागाकडून मिळू शकली नाही .तेथे महापालिकेचे एक जे ई आले व त्यांनी कळविले की मी सर्व कंपन्यांना फोन केला मात्र कोणाचे काम आहे ते कळत नाही असे ते म्हणाले.महत्त्वाचे वाहतुकीचे रस्ते खोदताना ना सुरक्षेची व्यवस्था केली जाते आहे ना वाहतुकीचे नियोजन व तसेच काम चालू असताना वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करावे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास सहन होता कामा नये.
खोदाई नंतर किती दिवसात रस्ते पूर्ववत केले जातील आणि ते काम नीट होइल यासाठी काय यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याची माहिती द्यावी. तसेच काम करणाऱ्या संबंधित कंपन्यांकडे थकबाकी आहे का आणि असल्यास ती कधी भरुन घेणार याची माहिती द्यावी. जितक्या मीटर खोदाईची परवानगी दिली आहे तितक्याच मीटर ची खोदाई होते आहे का याची शाश्वती कोण घेणार ? संबंधित कामाच्या परवानगीचे माहिती फलक व कामाच्या कालावधीची माहिती हि फलकाद्वारे खोदाईच्या ठिकाणी उभारण्यात यावेत अशी ही सूचना त्वरित देण्यात यावी. खोदाई च्या ठिकाणी होणाऱ्या अव्यवस्थेमुळे किरकोळ अपघात होतात व यात दुचाकीस्वारांना इजा झाल्यास त्यांच्या आयुष्यात त्याचा मोठा फरक पडतो प्रशासनाच्या व खोदाई करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकी घसरुन किंवा अन्य अपघात होवून एखाद्याला फ्रॅक्चर झाले तर त्याचे न भरुन येणारे नुकसान होते तरी याबाबतीत संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना आपण संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना द्याव्यात असे खर्डेकर यांनी पत्रात म्हंटले आहे.

