पंजाब नॅशनल बँक(पी.एन.बी) ११,४०० कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेले नीरव मोदी,मेहुल चोक्सी यांना अटक करून सरकार यांच्या कडून पैसे वसूल करणार का? हा प्रश्न जनतेला भेडसावत आहे,
अगोदरच जनतेचा व विशेषतः ठेवीदारांचा बँकावरील विश्वास उडत चालला आहे.आज सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँका ह्या कर्जाच्या विळख्यात सापडल्या आहेत.पी.एन.बी मधील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने नीरव मोदी व त्याच्या साथीदारांनी हा डल्ला मारला आहे.हे एकट्या मोदीचे काम नव्हे.त्याला राजकीय आशिर्वाद ही असू शकतो.या निमित्ताने बँकिंग क्षेत्रात नितीमत्तेची , प्रामाणिक तेची कशी दिवाळी-खोरी निघाली आहे याची प्रचिती जनतेला येत आहे.
एरवी सामान्य माणूस कर्ज मागायला बँकांच्या दारात गेल्यास त्याच्या कडून अनेक कागदपत्र व तारण घेऊनही त्याला कर्जासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या बँक बड्या उद्योगपतींना विना तारण विना ग्यारंटी कर्ज देण्यासाठी पायघड्या घालत आहे.हा सर्व जाणून बुजून व ठरवून झालेला प्रकार आहे.
एकटी पंजाब नॅशनल बँक नव्हे तर बँक ऑफ इंडिया,बडोदा बँक,भारतीय स्टेट बँक व इतर बँकांमधून मागील पाच वर्षात ६१हजार कोटीचे गैरव्यवहार झाला आहे.हे आकडे जनतेला भयभीत करणारे आहेत.हा गैरव्यवहार करणारे व्यापारी,उद्योगपती व बँक कर्मचारी हे लुटारू असून (व्हाईट कॉलर चीटर) यांनी बॅंका बुडवायला सुरवात केली आहे.इथे घोटाळे करून परदेशात पळून जाणे सोपे झालेले दिसते.प्रथम ललित मोदी.विजय मल्ल्या यात यशस्वी झाले.त्यांना आजपर्यंत पकडण्यात किंवा पैसे वसूल करण्यात अपयश आलेले दिसते.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो.एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून ह्याचा राजकीय लाभ उठवण्या पेक्षा अशा लुटारूंवर कारवाई करून जरब बसवायला हवी.तरच अर्थव्यवस्थेला शिस्त लागेल.
आज देशात भाजप चे सरकार आहे त्यांच्या नेत्यांच्या मते ह्यांची सुरुवात 2011 मध्ये म्हणजे यु.पी.ए च्या काळात झाली. तर काँग्रेस चे म्हणणे आहे की ही मंडळी पळून जाई पर्यंत रिझर्व बँक व अर्थमंत्रालाय व इतर कोणीच जबाबदार घटकांनी कारवाई का केली नाही. मोठे आर्थिक व्यवहार जिथे चालतात तिथे काटेकोर लेखापरीक्षक (ऑडिट) केले जाते त्यांच्याही लक्षात गोष्टी येऊ नयेत म्हणजे संशयाला नक्कीच जागा आहे.
“त्यांना (काँग्रेसला) ६० वर्षे दिलीत आम्हाला (भाजपला) ६० महिने द्या!”तसेच “ना खाऊंगा ना खाने दुगा असे म्हणत सतेवर आलेले पंतप्रधान नरेंद मोदी अर्थमंत्री अरुण जेटली व एकूणच सरकाने ह्या विषयाचे राजकारण न करता ह्या गुन्हेगारांची पाळेमुळे खणून त्यांच्या भोवतालचा फास आवळून त्यांना कडक शिक्षा व पैसेही वसूल केले पाहिजे.अन्यथा आता ही विषवल्ली फोफावत जाऊन असे अनेक मोदी व मल्ल्या निर्ढावतील.
नागरिक जेंव्हा आपल्या कष्टाचा पैसा बँकांमध्ये ठेवतात तेंव्हा त्याचा पूर्ण विश्वास असतो. आज अनेक बँका दिवाळखोरीत निघत आहेत.ठेवीदारांना लग्नकार्यासाठी,आजारपणासाठी पैसे मिळत नाहीत.व हे उद्योगपती,व्यापारी हे हजारो कोटी घेउन परदेशात पलायन करीत आहे.त्यामूळे सामान्य ठेविदारांच्या बँकावरील विश्वास कमी होत चालला आहे.तेव्हा ह्या समाजकंटाकाच्या च्या मुसक्या आवळ्ल्या पाहिजे. खरे तर पूर्वी बँकांमध्ये घुसून बँकावर दरोडे टाकण्यात येत तेव्हा बँक अधिकारी बहुधा अशा दरोड्यात सामील नसत .उलट त्यांना हानी पोहोचत . पण आता बँकांचे ग्राहक होऊन, अधिकाऱ्यांशी संगनमत करून हजारो कोटींचे काटज घेऊन ते बुडवून जाणाऱ्यांना ..दरोडेखोरच म्हटले पाहिजे ..आणि पूर्वीच्या दरोडेखोरांवर होत तशीच कारवाई यांच्यावर देखील व्हायला हवी .. वेळीच अशी कारवाई झाली नाही आणि असे दरोडे वाढत गेले तर साहजिकच बँकात पैसे ठेवायला कोणी पुढे येणार नाही . आणि बँकात पगार जमा करणार असेल अशी नौकरी कोणी स्वीकारणार नाही .. बड्या लुटारूंना साथ देणाऱ्या बँकांवर लोकांनी बहिष्कार टाकण्याची वेळ या देशात येणार आहे काय ? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही .