पुणे – बँक ऑफ महाराष्ट्रने गृह आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले असून हा दिनांक 1 सप्टेंबर २०१७ ते 31 डिसेंबर २०१७ दरम्यान मंजूर होणार्या कर्जासाठी हा निर्णय लागू असेल. सणासुदीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या कालावधी दरम्यान दुसऱ्या बँकेचे गृहकर्ज बँक ऑफ महाराष्ट्रकडे स्थलांतरित केल्यास त्यावरचे प्रक्रिया शुल्क माफ केले जाणार आहे. उत्सवांच्या काळात बँकेचा किरकोळ पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या हेतूने ही सवलत जाहीर करण्यात आली आहे.
बँकेने त्यांच्या गृह कर्ज विभागात तिमाहीगणिक स्थिर वाढ साध्य केली आहे, तर वाहन कर्ज विभागात, मार्च २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७- १८ पहिल्या तिमाहीत २८.२२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाहन कर्ज विभागात वैयक्तिक वाहनांचा मोठा वाटा आहे.
२०२२ पर्यंत सर्वांना घर मिळवून देण्यासाठी सरकारने आखलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेला बळकटी देण्यासाठी बँकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गृहकर्ज पोर्टफोलिओच्या वाढीला चालना मिळाली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण १४०० खाती समाविष्ट करण्यात आली असून एकूण पोर्टफोलिओ २२१ कोटी रुपयांचा आहे. दोन ऑगस्ट २०१७ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आपल्या द्वैमासिक आर्थिक धोरणात २५ बीपीएस रेपो रेट कपात जाहीर केल्यानंतर आपल्या सर्व कर्ज दरात ५ – १५ बेसिस पॉइंट्सची (बीपीएस) घट करणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही पहिली बँक ठरली होती.
घरखरेदीचे स्वप्न पाहाणाऱ्या संभाव्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने गृह तसेच वाहन कर्जात आवश्यक बदल केले आहेत. कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताही सोपी केली असून त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मोठ्या ग्राहक वर्गाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा आहे. आर. पी. मराठे, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणाले, ‘धोरण उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. या सणासुदीच्या काळात सर्व प्रकारच्या आर्थिकस्तरातील ग्राहकांना आपले घर किंवा कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता बहाल करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. दरम्यान, आम्ही आमच्या प्रत्यक्षातील भागधारकांबरोबर असलेला संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत, ज्यातून त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आमच्या सेवा तयार करण्यासाठी व पर्यायाने या विभागात विकास साधण्यास मदत होईल.’
गृहकर्ज केवळ एका आठवड्यात, तर वाहन कर्ज ४८ तासांत उपलब्ध करणे शक्य व्हावे यासाठी बँकेने आपल्या प्रादेशिक कार्यालयांत खास टीम तयार केली आहे. बँकेद्वारे सध्याचे गृहकर्ज, एमएसएमई, पगाराची कॉर्पोरेट खाती यांसाठीच्या वाहन कर्जावर ०.२५ टक्के व्याजदर देण्याचे जाहीर केले आहे.

