पुणे- गेल्या वेळी पक्ष सोडून भाजपात गेलेल्या एका माजी नगरसेवकाच्या पुनर्प्रवेशावरून पुण्यातील कॉंग्रेस पक्षात असलेली गटबाजी समोर आल्यानंतर काल रात्रीपर्यंत दोन माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षातील कुरघोड्या थांबविण्यासाठी पूर्व भागातील एका हॉटेलात बैठका घेतल्या . माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करत कॉंग्रेसमधील शहरातील बडे नेते मानले जाणारे बागवे पिता पुत्रांना ‘त्या’ माजी नगरसेवकाला तूर्तास कुठलाही पदभार देण्यास स्थगिती निर्देश दिल्याचे सांगून त्यांची समजूत काढल्याचे वृत्त आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत बागवे यांचा अगदी अल्पशा मतांनी पराभव झाला होता ,यावेळी कॉंग्रस मधून संबधित नगरसेवकाने भाजपात जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार केला होता . पक्षाकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद घेऊन पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना परस्पर प्रवेश कसा दिला जातो यावर हरकत घेत बागवे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली , आणि त्यांच्या पुत्राचा भाजप प्रवेशासाठी काहींनी मार्ग सुकर करण्याचे काम केले . या संदर्भातले वृत्त पसरले आणि काल बागवे पिता पुत्र दोघेही कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अनुपस्थित होते .त्यानंतर जोरदार हालचाली झाल्या आणि २ माजी मुख्यमंत्र्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन बागवे पिता पुत्रांची नाराजी दूर केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान शहर कॉंग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले कि,’बागवे यांची नाराजी दूर करण्यात आली असून कसब्यात विजयासाठी ते आज उद्या काम सुरु करतील.
प्रत्यक्षात वरवर नाराजी वर पडदा पडल्याचे सांगण्यात येत असले तरी हा तिढा मात्र आतून आहे तसाच असल्याचे दिसते आहे.मात्र किमान कसब्याची निवडणूक पार पडेपर्यंत हि नाराजी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आल्याचे मानले जाते आहे.

