‘जीवना’ गाण्याचे ‘लेट्स बी फ्रेंड’ व्हर्जन रिलीज
लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या ‘सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली निर्मित आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणा-या या सिनेमातील ‘जीवना’ गाण्याचे नुकत्याच एका कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले आहे, स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातील या गाण्याला लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, अवधूत गुप्तेने गायलेले या गाण्याचे ‘लेट्स बी फ्रेंड’ हे व्हर्जनदेखील आता प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे.
पुण्यातील जेएसपीएम कॉलेजमध्ये पार पडलेल्या या सिनेमाच्या पोस्टर लॉंचदरम्यान ‘जीवना’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यादरम्यान स्वप्नील आणि अवधूतमध्ये या गाण्याच्या व्हर्जनची जुगलबंदीदेखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली होती. तीच जुगलबंदी आता सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
अवधुत यांच्या ‘लेट्स बी फ्रेंड’ या गाण्याचे बोल त्याने स्वतःच लहिले असून, स्वप्नीलच्या आवाजातील मूळ गाणे वैभव जोशी यांनी लिहिले आहे. तसेच या दोन्ही गाण्यांचे संगीतदिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले असून,. या दोघांपैकी जे गाणे लोकांना अधिक आवडेल, तेच गाणे ‘बॉईज’ या सिनेमात दाखविले जाणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी देखील ही मोठी पर्वणीच ठरणार आहे.
अवधूतने गायलेले ‘लेट्स बी फ्रेंड’ हे व्हर्जनदेखील तेवढ्याच ताकदीचे असल्यामुळे, नेमके कोणते गाणे अधिक चांगले, याचा सर्वस्वी निर्णय प्रेक्षकांवर सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात विजेत्या झालेल्या प्रेक्षकांना परदेशवारीची नामी संधी देखील मिळणार आहे.
कम्प्लीट यूथ एंटरटेनिंग असणाऱ्या या चित्रपटात पार्थ भालेराव झळकणार असून सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हे कलाकार प्रथमच लोकांसमोर येणार आहेत. तसेच आतापर्यंत गायक, निर्माता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर आलेला अवधूत या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे. तीन मित्रांची धम्माल ‘बॉईज’ गिरी दाखवणारा हा सिनेमा येत्या यूथ फेस्टिवल महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.