रत्नागिरी- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळून येथील घरावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळले आहेत.सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या घराचा बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, भास्कर जाधव हे सध्या मुंबईत असून लवकरच याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती आहे.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, भास्कर जाधव किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना शांत बसणार नाही. जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. ज्यांनी कुणी हल्ल्याचा प्रयत्न केला, त्याला आयुष्यभराचा धडा शिकवला जाईल.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भास्कर जाधव सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर तसेच नारायण राणेंवर सडकून टीका करत आहेत. काल सिंधुदूर्ग येथे झालेल्या जाहीर सभेतही भास्कर जाधवांनी नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडी चोर असा करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या राजकीय वादाची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे तर नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. नारायण राणे यांचे सुपूत्र नितशे राणे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
नितेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहे. नारायण राणे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे राणेंवर अशी टीका झाल्यास कार्यकर्ते गप्प कसे बसणार?
ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यापासून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वत्र दणदणीत विजय झाल्याने, गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड बाटल्या, स्टंम्प व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्षात राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

