पुणे – महाराष्ट्रातील 50,000 नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा
करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याची घोषणा शाश्वत उत्पादने तयार करणारी जगातील
आघाडीची पुरवठादार कंपनी एटलस कॉप्कोने आज केली. कंपनीच्या कर्मचा-यांचा उत्स्फूर्त उपक्रम
असलेल्या वॉटर फॉर ऑल (सर्वांसाठी पाणी) अंतर्गत प्राधान्याचा सीएसआर प्रकल्प म्हणून
राज्यभरात राबवला जाणारा ‘जलदूत’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.
‘वॉटर फॉर ऑल’चा महाराष्ट्रातील ‘जलदूत’ हा प्रकल्प प्रामुख्याने ‘सेवावर्धिनी’ या स्वयंसेवी संस्थेच्या
सहकार्याने आणि गावांत काम करणा-या आणखी काही स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन हाती घेण्यात
आला होता. पाणी व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतीचे आधी प्रशिक्षण घेऊन नंतर ते गावक-यांना
देण्यासाठी ‘जलदूत’ या उपक्रमामध्ये 25 गावांतील 40हून अधिक लोकांची निवड करण्यात आली
होती.
एटलस कॉप्को इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जिओव्हॅनी व्हॅलेन्ट म्हणाले, ‘गरजवंत क्षेत्राला स्वच्छ
आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे हे एटलास कॉप्कोचे जगभरातील अतिशय जिव्हाळ्याचे उद्दिष्ट आहे.
‘जलदूत’ हा असा उपक्रम आहे, ज्याचा गरजू लोकांना पाणीपुरवठा करण्याबरोबरच शेतीसाठी
मान्सूनवरील अतिअवलंबित्व कमी करण्याचा उद्देश आहे. हा प्रकल्प पूर्ण होत असल्याची घोषणा या
जलदूतांच्या उपस्थितीत करणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.’
हा प्रकल्प महाराष्ट्रात अडीच वर्षे राबवला गेला आणि त्यासाठी एटलस कॉप्को आणि कंपनीच्या
कर्मचा-यांनी सव्वादोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली. राज्यातील दुष्काळप्रवण भागांतील
50 हजारांहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. स्थानिक लोकांना पाणी
व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे हे याचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते.
प्रकल्पात सहभागी व्यक्ती अर्थात जलदूतांनी सहभाग संसाधन सर्वेक्षणे करून त्यांच्या गावांचे
तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केले. त्यानंतर प्रत्यक्षात होऊ शकतील, अशी 24 कामे निश्चित
करून ती पूर्ण केली गेली. त्यामध्ये जलसंवर्धनासाठी प्रयत्न, सलग समतल चर, जलशोषण चर,
गॅबियन बंधारे, बंधारे दुरुस्ती आणि नवीन सिमेंट बंधारे बांधणे आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी
साठवण टाक्या आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश होता.