पुणे-महाराष्ट्रातील उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी देआसरा फाउंडेशनचा जनता सहकारी बँके सोबत सामंजस्य करार आहे. त्याच बरोबर बँकेने छोट्या उद्योजकांसाठी सुलभ कर्ज योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत जनता सहकारी बँकेमध्ये व्यावसायिक कर्जासाठी येणाऱ्या तरुण उद्योजकांना व्यवसाय, कर्ज विषयक मार्गदर्शन तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी देआसरा फाउंडेशन सहाय्य करणार आहे.
जनता सहकारी बँकेतर्फे “जनता स्टार्ट-अप कर्ज” हि योजना चालू करण्यात आली आहे. या अंतर्गत व्यवसायभिमुख शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर तरुणांना दहा हजार ते दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्ज बँकेच्या महाराष्ट्रातील ७० शाखांमध्ये उपलब्ध असून देआसरा फाउंडेशनच्या मदतीने उद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्ट व व्यवसायासाठी लागणाऱ्या अन्य सेवा यासाठी मदत करण्यात येणार आहे. या कर्जाचे व्याजदर महिलांसाठी ११.२५% तर पुरुषांसाठी ११.५०% असा ठेवण्यात आला असून, हि योजना ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन उद्योजकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास आणि विस्तार करण्यास प्रोत्साहित करीत आहे.
या योजनेबाबत माहिती देताना प्रज्ञा गोडबोले म्हणाल्या की, “देआसरा अनेक योजना आणि प्रकल्पांच्या सहाय्याने स्थानिक आर्थिक विकासात योगदान देते. त्यामुळे तरुण उद्योजकांमध्ये कार्याक्षमता वाढते व ते स्पर्धेच्या जगात टिकून राहतात”. उद्योजकता वाढवणे, उद्योजकांना पाठिंबा देणे आणि नवीन नोकरीच्या संधी निर्माण करणे असा प्रयत्न देआसरा फाउंडेशन कायमच करीत असते. “उद्योजकांना स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर व्यवसायात योग्य मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी आम्ही ही,जनता स्टार्टअप योजना तयार केली असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देआसरा फाऊन्डेशन आम्हाला सहकार्य करत आहे. व्यवसायात वाढ होण्यासाठी आवश्यक साधनांसह त्यांची क्षमता वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल” असे जनता सहकारी बँकेचे पदाधिकारी म्हणाले.