नृत्य, नाटक, मालिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांमध्ये यशस्वी कारकीर्द करणाऱ्या अश्विनी एकबोटे यांचे पुण्यात ‘नाट्य-त्रिविधा’ या कार्यक्रमादरम्यान दुःखद निधन झाले. या धक्याने चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टी हेलावून गेली.
२२ मार्च हा दिवंगत अश्विनी एकबोटे यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसाचे औचित्य साधून ‘भारतीय कला केंद्र’ आणि ‘त्या साऱ्या’ तर्फे भरत नाट्य मंदिर येथे ‘अशी सजली बावनखणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इहलोकाचा प्रवास संपवून दुसऱ्या जगात प्रवेश करताना आपला रंगभूमीवरचा प्रवास अश्विनी एकबोटे यांच्या नजरेसमोर कसा तरळला असेल अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन अश्विनी एकबोटे यांच्या शिष्य सुचेता जोशी यांचे होते. या कार्यक्रमात त्यांच्याच शिष्या प्रसिद्ध नृत्यांगना सायली कानडे, मानसी वझे, प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे, अश्विनी कुलकर्णी तसेच इतर कलाकारांनी सादरीकरण केले.
या प्रसंगी दरवर्षी अश्विनी एकबोटे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २२ मार्च रोजी शास्त्रीय नृत्य क्षेत्रात सन्माननीय कामगिरी करणाऱ्या कलावंतास ‘नृत्य समाधी पुरस्कार’ देण्यात येणार आहे अशी घोषणा ‘भारतीय कला केंद्र’ आणि ‘त्या साऱ्या’ च्या वतीने करण्यात आली. पहिला ‘नृत्य समाधी पुरस्कार कर्नाटकी संगीताचे प्रसिद्ध गायक श्री. शिवप्रसाद यांना प्रदान करण्यात आला.