पुणे, दि. १० : तब्बल ७५ प्रकारांच्या विविध माध्यमांचा उपयोग करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ७५ व्यक्तिचित्रे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचे पर्यवेक्षक आणि चित्रकला शिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी साकारली आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या आणि रमणबागेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा अभिनव उपक्रम करण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू आणि डीईएसचे संस्थापक असणार्या लोकमान्यांना त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात ही आगळी-वेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली. या चित्रांची निर्मिती करण्यासाठी गेल्या चौदा महिन्यांतील ५०० तासांचा कालावधी लागला.
लोकमान्यांचेे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते आज ही व्यक्तिचित्रे रमणबागेचे मुख्याध्यापक सुनील शिवले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तैलरंग, जलरंग, पोस्टर कलर, पेन्सिल शेडिंग, कॅनव्हास पेंटिंग, पुठ्ठा, वर्तमानपत्रे, विविध प्रकारचे कागद, कोलाज, अॅल्युमिनियम, शाडू माती, फायबर, रंगीत सुतळी, रंगीत कागद, निब पेंटिंग, मेहंदी पेंटिंग, एम्बॉस, वाळलेले गवत, झाडांची पाने, कडधान्ये, पझल, रांगोळी, मोती, मणी आदी माध्यमांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यक्तिचित्रे साकारण्यात आली.
विविध वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांच्या आधारे लोकमान्यांचा जीवन प्रवास चित्रबद्ध करण्यात आला आहे. शेंगांची टरफले, केसरी वर्तमानपत्राचे कोलाज, अक्षर गणेश, पझल, खादीचे कापड, कडधान्ये, झाडांची पाने आदी माध्यमांच्या सहाय्याने अनुक्रमे लोकमान्यांचे बालपण, केसरीची स्थापना, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, स्वदेशी, आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व आणि निसर्गरम्य सिंहगडावरील भटकंती हे प्रसंग रेखाटण्यात आले आहेत.