दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर भर रस्त्यावर हल्ला झाला. मोतीनगर परिसरात ते शनिवारी रोड शो करत होते. त्याचवेळी अचानक एक युवक त्यांच्या जीपच्या बोनटवर चढला आणि चापट मारले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान त्यांनी हात उचलून सर्वांना अभिवादन केले. याच दरम्यान लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित आपच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडले.
केजरीवालांवर हल्ला करणाऱ्याचे नाव सुरेश असून तो कैलास पार्क येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये आरोपी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करताना दिसून आला. दरम्यान आरोपीला पकडून मोतीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याची सविस्तर चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप सुरेश कैलास पार्क परिसरातच स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय करतो. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर रोड शोमध्ये हल्ला झाल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2014 मध्ये सुद्धा एका युवकाने त्यांच्या वाहनावर चढून कानशिलात लावली होती. त्यावेळी सुद्धा आपच्या कार्यकर्त्यांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. त्याहीपूर्वी 2013 मध्ये केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

