पुणे ता.१४ : अरंगेत्रम सारखे अवघड प्रशिक्षण व्हर्चुअल माध्यमातून पूर्ण करून तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर त्याचे नेत्रदीपक सादरीकरण करण्याची किमया औंध येथील कलानिकेतन या संस्थेच्या विद्यार्थिनींनी रविवारी करून दाखवली.टिळक स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कलानिकेतनच्या अंकुरा राहुल चौधरी, दिया प्रदीप रमाणी, अनुषा वासुदेवन, अनुष्का दीपक कांबळे, दिया अभय दलाल, परख आदर्श त्रिपाठी, साक्षी कल्पेश पटेल, सानिका सूरज टिळक, आणि वैष्णवी सुनील भोंगाळे या विद्यार्थीनिंनी अरंगेत्रमचे उत्तम सादरीकरण केले.
यावेळी बोलताना माने म्हणाले, कोरोना काळात सर्वच शिक्षण ऑनलाईन झाले, कला क्षेत्रही याला अपवाद राहिला नाही. प्रत्यक्ष शिक्षण जितक्या सहजतेने घेता येते तितक्या सहजतेने ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. ऑनलाईन शिक्षण इतके समर्पकपण नसते हे शिक्षण घेताना अनेक समस्या भेडसावत आहेत. भरतनाटयम या नृत्यप्रकाराला तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. काळानुरूप यामध्ये अनेक बदल घडून आले. तथापि, आजचा अरंगेत्रम हा कलाअविष्कार सर्व अर्थांनी वेगळा होता. नाट्याबाबत कवी कालिदासाने लिहिलेल्या ‘नाट्य भिन्नरुचेर जनस्य बहुधापेक संमराधनम्’ या वाक्याची अनुभूती यावी असे यांचे सादरीकरण होते.

संस्थेच्या प्रमुख उमा टिळक तसेच विश्वजितजी टिळक यांच्यासह सहका-यांनी गेली अनेक वर्षे शेकडो विद्यार्थिनी घडवल्या आहेत. गेली दोन वर्षे जगात कोवीडच्या साथीमुळे शिक्षणाच्या परिभाषा बदलल्या आहेत. प्रयोग आणि प्रात्यक्षिके करण्याची आवश्यकता असलेल्या शाखा-कलाशाखा आभासी म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने शिकवीत आहेत. या संस्थेनेही आपल्या चाळीस विद्यार्थिनींना एकाच वेळी व्हर्च्युअली नृत्य शिक्षण देऊन त्यांची कला आज प्रथमच रसिकांसमोर सादर केली. त्यामुळे हा कार्यक्रम वेगळ्या आव्हानांवर मात करीत कला सादर करताना वेगळे समाधान देणारा ठरला. विविध भावछटा,पद्ण्यास यांच्या उत्तम मिलाफातून प्रेक्षकांना उच्च दर्जाची नर्तन कला पाहायला मिळाली. कलानिकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींचे आणि त्यांच्या गुरूंचे सुनील माने यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

