दांडेकर पूल परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था
पुणे, दि. ३ फेब्रुवारी : दांडेकर पूल परिसरातील सार्वजनिक शौचालय दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी शिवसेनेतर्फे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. अकार्यक्षम पुणे मनपा प्रशासन, अकार्यक्षम स्थानिक नगरसेवकांमुळे विकासपुरुषाची महाआरती करण्यात आली.
दांडेकर पूल परिसरात काही वर्षांपूर्वी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र त्यांना कुलूप लावून ठेवल्यामुळे त्या वापराविना पडून आहेत. तसेच याठिकाणी काही शौचालयांना दारे नाहीत तर काहींना कड्या नाहीत. पाण्याच्या टाकीत आठ-पंधरा दिवस पाणी नसते. शौचालयाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणच्या समस्या अनेकवेळा क्षेत्रिय कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवकांना सांगून देखील जाणीवपूर्वक या भागात दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी असंघटीत कामगार सेनेचे अध्यक्ष अनंत घरत, शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, विभाग संघटक नंदू येवले, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, प्रभाग समन्वयक प्रतीक आल्हाट, शाखाप्रमुख रवी भोसले, युवती सेनेच्या मीनल भोसले, नितीन रावलेकर, गणेश घोलप, सागर ढावरे, राहुल शिंदे, स्थानिक महिला शिवसैनिक उपस्थित होते.

