पुणे-शिवाजीराव भोसले सहकारी बँकेस स्वतःच्या जागा भाड्याने देऊन सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना बँकेच्या संचालक पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच संचालक मंडळाचा पुढील पाच वर्षांच्या कालावधीची मुदत समाप्त होईपर्यंत कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालक पदाची निवडणूक लढवता येणार नसल्याचे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
याबाबत सुधीर रामचंद्र आल्हाट (रा. शिवाजीनगर) यांनी सहकार आयुक्तांकड़े तक्रार दिली होती.अनिल भोसले हे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत, तर त्यांच्या पत्नी सौ. रेश्मा भोसले या भाजपाच्या पाठिंब्यावर पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. भोसले यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेला आपल्या स्वतःच्या आणि आपल्या फर्मच्या मालकीच्या मिळकती भाड्याने दिल्या. यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 78 (1) (ब) मधील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 57 (1) अ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकारे संचालकांना संस्थेशी हितसंबंध निर्माण करणारा कोणताही करार करता येत नाही. तरीही भोसले यांनी विद्यानगर, कोथरुड, डेक्कन, विश्रांतवाडी आणि येथे तसेच बँकेच्या शिवाजीनगर मुख्यालयासाठी आपल्या जागा भाड्याने दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर संचालकपद रदची कारवाई केली आहे. तसेच कोणत्याही सहकारी संस्थेत स्वीकृत सदस्यपदी किंवा नामनिर्देशित करण्यासही अपात्र ठरवण्यात आले आहे