मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि ऍक्सिस बँकेत सहकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रीय शांततेसाठी आयोजित खानपान कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले. 2 फेब्रुवारीला वॉशिंग्टन, डी. सी. च्या हिल्टन आंतरराष्ट्रीय बॉलरूम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित काही भारतीय चेहऱ्यांपैकी अमृता देवेंद्र फडणवीस हा एक चेहरा होता. जगामध्ये शांततेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी उपस्थित प्रतिनिधी आणि नेत्यांसमोर ‘प्रेमाची ताकद’ याविषयी बोलण्याची संधीही यावेळी अमृता फडणवीस यांना मिळाली.
याविषयी बोलताना, ‘प्रेमाच्या ताकदीविषयी माझे विचार जगभरातील नेते आणि प्रतिनिधीसमोर मांडण्याची संधी मिळल्याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार प्रत्यक्षदर्शी ऐकण्याचे भाग्य लाभल्याने आपण सुखावल्याचे त्या म्हणाल्या.’ या संधीचे सोने करत भारतात क्षणोक्षणी जाणवणाऱ्या वैविध्यतेत एकतेचे दर्शन त्यांनी उपस्थितांना
घडवले. “29 राज्य, 22 भाषा आणि 1600 उपभाषांनी नटलेल्या या देशात दिवाळी, ईद आणि ख्रिसमस् सारख्याच उत्साहाने साजरे होत असल्याचे त्या अभिमानाने म्हणाल्या. भारताच्या जमेच्या बाजूंविषयी बोलताना काही उणिवांवरही त्यांनी भाष्य केले. भारतातील दुष्काळग्रस्त विभाग, शेतकऱ्यांची दयनीय स्थिती आणि स्त्रियांवर अजूनही होणारे अत्याचार यासारख्या काही समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. त्याशिवाय जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माणुसकीच्या दिशेने निस्वार्थी कामे करण्याची गरज
असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या. अंतत: 5000 वर्ष जुन्या भारतीय वारस्याला सलाम करीत ‘जय हिंद, जय भारत’” अशा जयघोषात त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. दरम्यान, 130 देशांमधून तब्बल 3,000 हून अधिक नेते आणि प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.



