हरसिंगार’मधून उलगडली नायिकांची शृंगारशिल्पे!
रसिकांना घडले नृत्य-शिल्पांच्या
साधर्म्य स्थळांचे विलोभनीय दर्शन
पुणे: स्त्रीची मनोवस्था नृत्यातून उलगडणार्या नायिका अन् मूर्ती शिल्प व चित्रात आढळणारी ‘त्या’ नायिकांची साम्यस्थळे असे दोन भिन्न कलाकृतींमधील विलक्षण साधर्म्य रसिकांसमोर उलगडले. निमित्त होते रोचित कथक अकादमीतर्फे झालेल्या ‘ हरसिंगार ‘ या मैफलीचे.
संस्थेच्या ४० व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर सुरू असलेल्या ‘पारितोष ‘ या शृंखलेतील ‘हरसिंगार’ ही नृत्यरचना नुकतीच ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे प्रस्तुत झाली. यावेळी नृत्याबरोबरच साहित्य, संगीत, चित्र, शिल्पातून ठळकपणे विशद होणारे शृंगार नायिकांमधील साम्य विविध सांकेतिक दाखले देत पं. रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व संस्थेच्या संचालिका गुरु रोशनताई दात्ये यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रसिकांसमोर मांडले. तर रोशनताईंच्या शिष्यांनी आपल्या कलात्मक नृत्याविष्कारातून अष्टनायिकांच्या मनोवस्थांचे दर्शन रसिकांना घडविले. मुग्धा, शुक भासिका, स्वाधीन पतिका, खंडिता, कर्पूर मंजरी, मध्या, प्रोषित पतिका आणि अभिसारिका या अष्टनायिका नृत्याभिनयातून साकारत केतकी वाडेकर, रसिका कुलकर्णी, धनश्री पोतदार, प्रिया भागवतकर, आभा सोमण, प्राजक्ता राज, मुग्धा बेलवलकर यांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी त्यांना अजय पराड (संवादिनी), समीर पुंणतांबेकर (तबला), सुनील अवचट (बासरी), सारंगी संदीप मिश्रा (सारंगी), अंकिता दामले (गायन), तेजस मिस्त्री (गायन) यांनी समर्पक साथ दिली.
प्रत्येक कलेला एक स्वतंत्र कला म्हणून दर्जा प्राप्त झालेला असला तरी या कला एकमेकांना पूरक आहेत आणि इतर कलांच्या साहाय्याने प्रत्येक कला समृद्धच झाली असल्याची अविस्मरणीय अनुभूती रसिकांना या मैफिलीच्या निमित्ताने आली.
प्रसिद्ध संगीतकार चैतन्य कुंटे यांनी शृंगार नायिका व अभिजात भारतीय संगीत यांचा असणारा थेट संबंध यावर रसाळ विवेचन केले. नाट्यशास्त्रातील सांगितिक संकेत, धृपद व नंतर ख्याल गायकीतून व्यक्त होणाऱ्या नायिका, ठुमरीतील लग्गी आणि नायिकेच्या भावनांशी असणारा परस्पर संबंध यावर सह उदाहरण भाष्य त्यांनी केले. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन नवोदित शिष्यांना फलदायी ठरले.