पुणे : स्वच्छ, सुंदर, निरव सकाळी पुणेकरांच्या आसमंतात एक अनोखी रंगछटा उमटली… कधी अवकाशात स्वच्छंदी विहार करणारी लयकारी, तर कधी भारदस्त आवाजात खर्जातून थेट तार सप्तकाचा प्रवास घडवणारी सुरेल अदाकारी… कधी गुरुजनांना सुरेल भेट तर कधी त्यांच्या आठवणींना उजाळा अशा विविध रंगछटांनी ‘सकाळच्या रागांची’ स्वरांजली पं. बबनराव हळदणकर यांना अर्पण करण्यात आली.
आर्टिस्ट्री पुणे यांच्या वतीने पं. श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर यांच्या ९० व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या शिष्यांच्या गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पं. हळदणकर यांच्या शिष्य कविता खरवंडीकर व पं. यांचे शिष्य आणि पुत्र शौनक अभिषेकी यांचे गायन झाले. त्याचप्रमाणे या वेळी ज्येष्ठ साहित्यिक व कलारसिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर, उषा हळदणकर, पं. विनायक थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
मैफलीची सुरुवात कविता खरवंडीकर यांच्या मधुर सुरांनी झाली. खरवंडीकर यांनी पं. हळदणकर यांच्याकडे २० वर्षे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. आग्रा घराण्याच्या गायकीचे बारकावे टिपत त्यांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यांनी राग ललतने आपल्या गायनाला सुरुवात केली. आलाप, रंगाचा विस्तार आणि त्यात शुभ्र अवकाशात स्वच्छंदी विहार करणारे सूर, लयकारी याने रसिकांना भारावून टाकले. या वेळी त्यांनी आपल्या गुरूंना अभिवादन करत त्यांच्याच बंदिशी पेश केल्या. ‘कासे कहू मै ये… ‘, ‘वेगेवेगे आओ मोहें दियो दर्शन…’ या बंदिशी सादर केल्या. त्यांनतर राग खट सारखा कठीण व दुर्मिळ राग त्यांनी पेश केला. यात श्रुतीस्वर अधिक असतात. ‘विद्याधन गुणीजन सो कहानी…’, ‘करत गुणगान गुणीजन सब…’ या बंदिशीही त्यांनी पेश केल्या. त्यानंतर आपल्या गुरूंची आठवण म्हणून त्यांचा हिंडोर रागातील तराण्याचा नजराणा त्यांनी पेश करत आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (हार्मोनियम), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
रसिकांना या स्वर जगताची भारावून टाकणारी ही सफर अजून उंचीवर नेत शौनक अभिषेकी यांनी राग जौनपुरी सादर करत पं. हळदणकर यांच्या बंदिशी पेश केल्या. यात ‘काही करत बरजोरी…’ यात झुमारयात ख्याल व तीन तालात द्रुत सादर केला. भारदस्त घुमटाकार आवाज, खर्जातून तितक्याच सहजतेने तारसप्तकात विहरण्याची हतोटी रसिकांना भावून गेली. त्यांनंतर शुद्ध सारंग रागातील ‘बीन दर्शवा देवो सजनवा…’ ही गुलामअली खान साहेबांची बंदिश पेश केली. त्यानंतर शब्द, तारण, पखवाजाचे बोल आणि सूर अशा चतुरंगांची अनुभूती देणारा चतरंग पेश केला. मैफलीचा समारोप ‘सब सखीया समझाये…’ या बंदिशीने झाला. या वेळी ते म्हणाले, “प्रत्येक संगीत साधकाने पं. हळदणकरांच्या बंदिशींचा अभ्यास करावा. नक्कीच नवीन काहीतरी गवसेल, शिकायला मिळेल. त्यांना धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (हार्मोनियम), सत्यजित बेडेकर, राज शहा (तानपुरा) यांनी साथसंगत केली.