पुणे- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या दरम्यान साजरा करण्यात यावा.याबाबतचा सविस्तर असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे , कॉंग्रेस पक्षनेता आबा बागुल,विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते साईनाथ बाबर यांनी दिला आहे
या प्रस्तावात पुढे असेही म्हटले आहे कि,’स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 रोजी सुरू होत आहे. त्या आधी 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त महात्मा गांधींनी “चले जाव’ चळवळीची साद घातली. सविनय कायदेभंगाचा इशारा दिला व ही चळवळ भारतभर पसरली. स्वातंत्र्यलढ्यामध्ये पुणे शहरातील अनेक स्वातंत्र्यसैनिक, व्यक्ती, पुणे शहरातील वास्तू यांचा मोठा सहभाग आहे. या निमित्ताने पुणे शहरामध्ये विविध नागरिक व संस्था यांच्या सहभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत साजरा करता येईल. या निमित्ताने खालीलप्रमाणे कार्यक्रम पुणे महानगरपालिकेकडून करण्यात यावेत.
पुणे महानगरपालिकेकडून विविध मान्यवरांना विविध पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार्थींना रोख रक्कम देणे शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. सबब त्या अर्थशीर्षकावरील रक्कम तसेच अंदाजपत्रकीय तरतूद खालील कार्यक्रमांसाठी खर्च करण्यात यावी.
- 23 मार्च भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, 22 जून चापेकर बंधू अशा क्रांतिकारकांचे दिवस साजरे करणे.
- फरासखाना येथील क्रांतिकारक पांडुरंग कर्णिक यांचे स्मारक सुशोभित करणे.
- क्रांतिकारकांचे छायाचित्र प्रदर्शन भरवणे.
- स्वातंत्र्यसैनिकांच्या घरावर कृतज्ञता फलक लावणे.
- परमवीर चक्र विजेत्यांचे स्मारक लवकर पूर्ण करणे.
- नारायण दाभाडे यांचे स्मरण करणे
- स्वातंत्र्यलढ्यातील विषयावरील फिल्म फेस्टिव्हल
- स्वातंत्र्याची यशोगाथा, एकांकिका स्पर्धा
- हेरिटेज वॉक, सायकल वॉक आयोजित करता येईल.
- पुण्यातील स्वातंत्र्यचळवळीतील ज्या जागेच्या स्थळावर चळवळ उभारली अशा स्मृती जागेवर कार्यक्रमाचे आयोजन करणे. उदा. आगाखान पॅलेस, येरवडा तुरुंग, गणेशखिंड रस्ता, वासुदेव बळवंत फडके स्मारक, केसरीवाडा अशा विविध ठिकाणी.
- 75 विविध संस्थांना महात्मा गांधींचा पुतळा व पुस्तक भेट.
- स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाचा कृतज्ञता सोहळा.
- तसेच पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलेल्या विविध स्वातंत्र्य सैनिकांचा स्थळांना भेट. उदा. राजगुरूनगर येथील स्थळाला भेट
- आजादीचा अमृत महोत्सव छायाचित्र प्रदर्शन
- स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तूंना नीलफलक
- पुण्यातील स्वातंत्र्यचळवळीत भाग घेणार्याप व सहभागी होणार्यात स्वातंत्र्यसैनिकांची माहिती पुस्तिका
- एकाच दिवशी 75 शाळांमध्ये स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेल्या सुपुत्रांची यशोगाथा. उदा. खुदीराम बोध, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, सावरकर इत्यादी.
- स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा इतिहास जतन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट.
- पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, मेळावे, लोककलेचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण.
- दांडी यात्रा, याद करो कुर्बानी, ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्यलढ्यातील नायक अशा विविध विषयांवर लघुपट स्पर्धा व लोकजागृती अभियान
सदर प्रकरणी स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्यात यावी. असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे , कॉंग्रेस पक्षनेता आबा बागुल,विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते साईनाथ बाबर यांनी दिला आहे


