पुणे
‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत असताना गोविंदासह नागरिकांच्या जीवासाठी तैनात असलेल्या गोविंदा रक्षक उपक्रमाचे पर्वती विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी स्वागत केले.
दहीहंडीच्या उत्सवाला कोणत्याही अपघाताचे गालबोट लागू नये आणि गोविंदा असो किंवा नागरिक प्रत्येकाचा जीव महत्वाचा ही भूमिका घेऊन माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि ह्यूमन हेल्थ सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवादरम्यान सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत पर्वती विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी गोविंदा रक्षक उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टरांचे पथक ,रुग्णवाहिका व स्वयंसेवकांचा ताफा तैनात करण्यात आला होता आणि हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले शिवाय दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनीही कौतुक केले. या उपक्रमाबाबत अमित बागुल म्हणाले कि, दहीहंडी उत्सवावेळी थरावर थर रचताना अनेक गोविंदा जायबंदी होतात तसेच नागरिकांनाही दुखापत होते. त्यामुळे अशा घटना घडल्यास जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

